। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताने कितीही शेजारधर्म सांभाळला तरी शेजारी त्यास फार काही प्रतिसाद देताना आढळत नाहीत. देशाचे शेजारी असलेले चीन आणि पाकिस्तान कुरघोडी करण्याची एक संधी सोडत नसून, चीन भारताची डोकेदुखी वाढविणार असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानचे आणि चीन एकमेकांना मदत करत परस्पर सहकार्यही वाढवत आले आहे. याचाच एक भाग म्हणून गेली अनेक वर्ष चीन पाकिस्तानला लष्करी मदत करत आला आहे. यााआधी जेफ-17 हे चौथ्या श्रेणीतील लढाऊ विमान विकसित करायला चीनने पाकिस्तानला मदत केली होती. यात वाढीव मदत म्हणून, चीन अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट टाईप-054 ही युद्धनौका पुढील काही दिवसांत पाकिस्तानला देणार आहे. तर आणखी 3 युद्धनौका चीन पुढील 3 वर्षात पाकिस्तानकडे सुपुर्त करणार आहे.
टाईप-054 ही सुमारे 4 हजार टन वजनाची फ्रिगेट-युद्धनौका जगातील अत्याधुनिक युद्धनौकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. रडारवर पटकन शोधता येणार नाही अशी या युद्धनौकेची रचना आहे. जमिनीवर, हवेत विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्याची या युद्धनौकेची क्षमता असून पाणबुडीविरोधी कारवाईतही ही युद्धनौका दर्जेदार समजली जाते. अशा 25 पेक्षा जास्त युद्धनौका या चीनच्या नौदलात याआधीच कार्यरत आहेत. येत्या पुढील काही वर्षात चीनी बनावटीच्या अशा चार युद्धनौका या पाकिस्तानकडे असतील. यामुळे निश्चितच भारताची डोकेदुखी वाढणार आहे. युद्धप्रसंग उद्भवल्यास टाईप-054 युद्धनौका या भारतीय नौदलापुढे मोठं आव्हान निर्माण करु शकतात, अशी या युद्धनौकेची क्षमता आणि ताकद आहे.
चीन वाढविणार भारताची डोकेदुखी
