अपूर्ण रस्त्याबाबत चिंचोटी ग्रामस्थ आक्रमक

विद्यमान आमदारांनी केले होते आठ महिन्यांपूर्वी भूमीपूजन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील चिंचोटी गावाच्या प्रवेशद्वारापासून गावापर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, पावसाळा संपत आला तरीदेखील गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना खड्ड्यांतूनच ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी गावातील मंदिरात ठेकेदाराला बोलावून रस्त्याच्या कामाबाबत जाब विचारला. खड्डे बुजविण्याचे काम आठ दिवसांत सुरु केले जाईल. पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल, असे आश्‍वासन ठेकेदार राहुल पाटील यांनी दिले आहे. रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.

अलिबाग-रोहा मार्गावर चिंचोटी गाव आहे. या गावाच्या प्रवेशद्वारापासून (चिंचोटी खिंड) संपूर्ण गावात जाईपर्यंत मार्ग खड्डेमय झाला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. सुमारे एक हजार 600 मीटरपर्यंतच्या रस्त्यासाठी सुमारे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सिध्दीविनायक या एजन्सीकडे रस्त्याचे काम देण्यात आले. रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते डिसेंबर 2023 रोजी मोठ्या थाटामाटात झाले. गाजावाजा करीत या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रोह्यामधील एका ठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले. ठेकेदाराने गावापर्यंत रस्त्यावर असलेल्या मोर्‍यांची कामे सुरु केली. रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी होण्याची अपेक्षा होती. मात्र, ती भंग झाली. पावसाळा सुरु झाल्यावर बांधण्यात आलेल्या मोर्‍यांचे पाईप बाहेर दिसू लागले. त्यामुळे यावरून वाहने चालविणेदेखील कठीण होऊन बसले. पहिल्याच पावसात मोर्‍या खराब झाल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ठेकेदाराने या रस्त्यावरील फक्त मोर्‍यांचे बांधकाम करून उर्वरित काम प्रलंबित ठेवलेे आहे. सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर चिखल झाल्यामुळे वाहने घसरून अपघात होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना आपल्या सायकली गावाबाहेर ठेवाव्या लागत असल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. खराब रस्त्यामुळे रुग्णांना नेणारी वाहनेदेखील येत नाहीत. ही वस्तुस्थिती माहीत असूनही ठेकेदार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती ग्रामस्थांनी श्रमदानातून केल्याचेही ते म्हणाले.

अखेर चिंचोटीमधील ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी एकत्र आले. त्यांनी श्रमदानातून माती, खडी टाकून खराब झालेल्या मोर्‍यांची कामे करीत रस्ता वाहतुकीला मोकळा केला. रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत ग्रामस्थांनी माहिती घेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी गावातील मंदिराच्या सभागृहात भिवंडी येथील ठेकेदार राहुल पाटील यांच्यासमवेत ग्रामस्थांसह पंच मंडळी, तरुण मंडळी यांची बैठक झाली.

या बैठकीत ठेकेदाराला त्यांनी जाब विचारला. गावातील ग्रामस्थ नरेंद्र पाटील यांच्यासह अनेकांनी प्रश्‍नांचा भडिमार केला. रस्त्याचे काम कधी करणार, असा सवाल उपस्थित केला. त्यावेळी यापूर्वी ठेकेदाराने केलेल्या कामाबाबत राहुल पाटील यांनी खंत व्यक्त करीत त्याच्या कामाचा दर्जादेखील योग्य नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याचे काम पाऊस थांबल्यावर दिवाळीपूर्वी अथवा नंतर सुरु केले जाईल. मात्र, सध्या आठ दिवसांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले जाईल, असे आश्‍वासन दिले. दरम्यान, रस्ता दर्जेदार तयार करण्यात यावा. सक्षम ठेकेदाराने काम करावे, अशी मागणी केली. काम योग्य न झाल्यास तीव्र भूमिका घेतली जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

चिंचोटी खिंड ते गावापर्यंतच्या रस्त्याचे काम यापूर्वी दुसरा ठेकेदार करीत होता. आता या रस्त्याचे काम माझ्याकडे देण्यात आले आहे. डांबरीकरणासह काँक्रिटीकरण असणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत हे काम केले जाणार आहे. आठ दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल. त्यानंतर दिवाळीपूर्वी अथवा नंतर पूर्णपणे रस्त्याचे काम सुरु करण्यात येईल.

राहुल पाटील,
ठेकेदार

Exit mobile version