संबंधित प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?
। पेण । प्रतिनिधी ।
तळीरामांना फक्त निमित्त हवंय. हे दु:खात पण पिणार आणि सुखात पण पिणार. गेल्या महिन्यात निवडणुकीच्या धामधूमीत हॉटेल, ढाबे, चायनिज सेंटरवर गावपुढार्यांची तसेच तळीरामांची रेलचेल होती. निवडणुका संपत नाही तोच थर्टी फर्स्टचे वेध लागले असून, शहराबाहेरील हॉटेल, ढाबे, चायनिज सेंटरवर रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून येत आहे. परवाना नसणार्या ढाब्यांवर व चायनिज सेंटरवर ओपन बार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. याकडे ना खादीवाल्यांचे लक्ष, ना खाकीवाल्यांचे लक्ष.
राज्य उत्पादन शुल्क विभागाविषयी बोलणेच चुकीचे आहे. एकदा का सूर्य मावळतीला गेला की, या ढाब्यांवर व चायनिज सेंटरवर दारुचा पूर, सिगारेट, चिलीमचा धूर पहायला मिळतोय, असे नागरिक सांगतात. हे पुढील 15 दिवस आपल्याला हमखास पहायला मिळणार असल्याचे बोलले जाते. हे कमी आहे की काय, तर शहराच्या आजूबाजूला ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या फार्म हाऊसवर रम-रमा-रमीची रेलचेल सुरू झाली आहे आणि यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर या विभागातील तरुणाईची पावले पेणकडे फिरकत आहेत, असे सांगण्यात येते. याठिकाणी तरुणाईच्या पार्ट्या रंगताना दिसून येत आहेत.
शहरात हॉटेल, ढाबे, चायनिज सेंटरवर दारू पिऊ नये म्हणून खाकीवाले कारवाईचा बडगा उचलतात. परंतु, यातीलच काही जण आपले हितसंबंध जपून लक्ष्मीदर्शनाची अभिलाषा ठेवतात. वरिष्ठ अधिकार्यांना कानोकान पत्ता लागून देत नाहीत, अशी जोरदार चर्चा आहे. त्यातच अमली पदार्थ विकणारे या खाकीवाल्यांना जवळचे वाटतात. त्यांना घेऊन ही मंडळी फिरताना दिसते, असा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. शहराबाहेर जाणार्या रस्त्यांवर चायनिज सेंटरवर खास थर्टी फर्स्टच्या निमित्त काही ऑफर ठेवलेल्या पहायला मिळतात आणि या ऑफरच्या जाहिरातींचा विचार करून तळीरामदेखील बेकायदेशीर दारू पिण्यास परवानगी देणार्या चायनिज सेंटरला पसंती देतात आणि मग सुरू होतो तो तळीरामांचा जागरण गोंधळ. ओपन बारला कधी डान्स बारचे स्वरूप प्राप्त होते हे ना तळीरामांना समजते, ना चायनिज सेंटरवाल्यांना समजते. रात्री 1-2 वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरू असतो. जस जसा थर्टी फर्स्ट जवळ येईल, तसा हा धिंगाणा वाढणार हे नक्की.
ओपन बारवर कारवाईची मागणी पेण शहराच्या आजूबाजूला, वडखळच्या आजूबाजूला, जिते-खारपाडाच्या आजूबाजूला तसेच पूर्व विभागामध्ये काही ठिकाणी चोरीछुपे हॉटेल, ढाबे, चायनिज सेंटरवर दारु पिणे गुन्हा असताना खुलेआम दारु पिण्यास परवानगी देण्यात येत असल्याने तरुणाई वर्दळ या ठिकाणी सुरू असते. यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. तरी याविरूद्ध कारवाईची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. उत्पादन शुल्क खाते काय करतेय, हेही पाहणे योग्य होणार आहे.







