। पुणे । प्रतिनिधी ।
राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष गटात चिन्मय सोमय्या (टीएसटी मुंबई) याने तर महिलांमध्ये सेनहोरा डीसूझा (मुंबई शहर) यांनी प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. नाशिकच्या तनीषा कोटेचा हिने मुलींच्या 19 वर्षाखालील गटात सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावले तर मुलांमध्ये नाशिकच्याच कुशल चोपडा याने विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली आहे.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित चिन्मय सोमय्या याने ठाण्याच्या द्वितीय मानांकित दिपीत पाटील याच्यावर मात केली. अतिशय चुरशीने झालेला सामना त्याने 11-8, 11-6, 14-12, 8-11, 7-11, 9-11, 11-8 असा जिंकला. सेनहोरा डीसूझा (मुंबई शहर) हिने अंतिम सामन्यात मनुश्री पाटील (टीएसटी मुंबई) हिचा पराभव केला. चुरशीने झालेला हा सामना तिने 7-11,12-10,13-11,11-7, 11-8 असा जिंकला. सातव्या मानांकित तनीषाने अटीतटीने झालेली ही लढत 11-9, 11-6, 7-11, 8-11, 11-7, 8-11, 12-10 अशी जिंकली. दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करीत चाहत्यांना खेळाचा आनंद मिळवून दिला. मुलांच्या अंतिम लढतीत कुशल याने अव्वल मानांकनास साजेसा खेळ करीत शर्वेय सामंत याच्यावर 11-7, 11-5, 11-8, 11-7 असा सफाईदार विजय मिळविला.