। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शहरातील तब्बल 18 हजारांपेक्षा अधिक मालमत्ता धारकांची नोंदणी करण्यात आली नसल्याने पालिकेचे दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न बुडत होते. पालिकेकडून नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात या मालमत्ता रडारवर आल्या असून, त्यांना कर लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पालिकेच्या सर्वेक्षणात चुकीच्या नोंदी आणि वाढीव बांधकामे आढळली आहेत. त्यांच्यावरही आता कर लावला जाणार आहे. चिपळूण पालिकेने आपल्या हद्दीमधील सर्व मिळकतीची पाहणी करून सुधारित वार्षिक कर योग्य मूल्याची यादी तयार केलेली आहे. 2024-25 मधील चतुर्थ सुधारित कर योग्य मूल्यांकनाची यादी पालिकेने नगर रचनाकार रत्नागिरी यांच्या प्राधिकृत मूल्यांकन अधिकारी यांच्याकडून तपासून घेतलेली आहे. ती नागरिकांना पाहण्यासाठी ठेवली आहे. नव्या सर्वेक्षणानुसार, शहरात एकूण सुमारे 32 हजार मालमत्ताधारक आहेत. त्यामध्ये साडेचार हजार नवीन मालमत्ताधारक तयार झाले आहेत. काही जुन्या इमारतींच्या नोंदी चुकीच्या झाल्या आहेत, तर काहींनी वाढीव बांधकामे केली आहेत. अशा एकूण 18 हजार मालमत्ताधारकांना पालिकेने नोटीस बजावली आहे.