चिपळूण पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत

। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण येथील महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही काळजी करू नका, चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू, असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ते शब्द हवेत विरल्याचे दिसून येत आहे. महापुराला दीड महिना लोटला तरीही पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. महापुरामध्ये चिपळूण शहरासह खेर्डी कळंबस्ते परिसरात सुमारे 10 ते 12 फूट पाणी आल्याने अनेक घरांत, दुकानात पाणी शिरले, तसेच खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यामुळे प्रापंचिक साहित्य, दुकानातील माल तसेच कारखान्यांमधील उत्पादनांचे मोठे नुकसान झाले. दोनच दिवसांपूर्वी चिपळूण व्यापारी महासंघटनेने येथील तहसीलदारांना शासकीय मदतीसंदर्भात निवेदन दिले असून, मदत न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. या इशार्याकडे शासन किती गांभीर्याने पाहते, हे लवकरच समजून येईल. मात्र, तोपर्यंत काय करायचे, असा प्रश्‍न व्यापार्यांना पडला आहे. काही मोजक्या व्यापार्यांनी आपल्या हिमतीवर व्यवसाय सुरू केले आहेत. उर्वरित पूरग्रस्त व्यापारी आपला पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी चाचपडत आहेत. याकडे शासनाला लक्ष देण्यास वेळ नाही असे दिसून येत आहे.

Exit mobile version