। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
यंदा परतीच्या पावसाने कहर केल्यामुळे खरीप हंगामाला फटका बसला आहे. चिपळूण तालुक्यातील 200 शेतकर्यांचे सुमारे 27 हेक्टर क्षेत्रांवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या कालावधीत हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला. यंदा चांगला पाऊस होऊनही अपेक्षित उत्पादन हाती आलेले नाही. यामुळे शेतकर्यांची दिवाळी निरुत्साही गेली.
सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना चिपळूण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. पोफळी, शिरगाव परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज पडल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळाली. यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात अंधार पसरलेला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत अनेकांच्या घरात वीज नव्हती. दिवाळी म्हटले की, घरांना रंगरंगोटी केली जाते. यावर्षी शेतकर्यांची दिवाळी शेतातच गेली.
वीर गावातील 31 शेतकर्यांचे 7.50 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. देवपाठमधील 23 शेतकर्यांचे 4.60 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या खालोखाल मुंढे, तळसर, शिरगाव, वेहळे, अनारी, कापसाळ या गावातील शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतीचे पंचनामे झाले आहेत. तालुक्यात 65 टक्के भातशेती कापण्यात आली आहे. ज्या शेतकर्यांचे पंचनामे झाले नसतील त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा.
– शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण