चिपळुणकरांची होणार मचूळ पाण्यातून सुटका

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

कोयना धरणातील उपलब्ध पाणी साठ्यावर कोयना जलविद्युत प्रकल्पात मे अखेरपर्यंत वीज निर्मिती करण्याचे नियोजन महानिर्मिती कंपनीने केले आहे. त्यामुळे चिपळूण शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे.

कोयना धरणातील पाण्यावर पोफळी, अलोरे येथील वीज निर्मिती प्रकल्पात वीज निर्मिती झाल्यानंतर ते पाणी कोळकेवाडी धरणात सोडले जाते. कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी तिसरा प्रकल्प आहे. तेथे वीज निर्मिती झाल्यानंतर कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीला सोडले जाते. नदीत सोडले जाणारे हे पाणी चिपळूण पालिका उचलते आणि शहरातील नागरिकांची तहाण भागवते. मागील काही महिने कोयना धरणातील पाणी पश्चिम महाराष्ट्रात सिंचन आणि वीज निर्मितीसाठी सोडले जात होते. त्यामुळे कोयना प्रकल्पात कमी प्रमाणात वीज निर्मिती केली जात होती. त्यामुळे वाशिष्ठी नदीला मुबलक पाणी सोडले जात नव्हते. परिणामी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलमधून नागरिकांना मचळू पाण्याचा पुरवठा केला जात होता. गोवळकोट, पेठमाप, शंकरवाडी भागातील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. त्यानंतर पालिकेने महानिर्मिती कंपनी आणि जलसंपदा विभागाला पत्रव्यवहार करून कोयना प्रकल्पात वीज निर्मिती करून वाशिष्ठी नदीत पाणी सोडण्याची विनंती केली होती.

सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणाचे गेट उघडून कोयना नदीमध्ये पाणी सोडले जात होते. तसेच कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे कोयना नदी पात्रात 2100 ते 2600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. नंतर हे प्रमाण कमी करण्यात आले.

राज्यात एप्रिल ते जूनमध्ये वीजेची मागणी वाढणार आहे. कोयना प्रकल्पातून जलद वीज निर्मिती होते. त्यामुळे मागणीच्या काळात प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य प्रमाणे वापर करण्याचे नियोजन केले आहे. कोयनेची वीज निर्मिती सुरू झाली तर वाशिष्ठी नदीत पाणी खेळते राहणार असून त्याचा उपयोग चिपळूण शहराला होणार आहे.

कोयना धरणातील पाणी पातळी - 644.906 मीटर
पाणीसाठा - 57.57 टीएमसी
पायथा वीज गृहातून सोडले जाणारे पाणी - 2100 क्युसेक्स
गेटद्वारे सोडले जाणारे पाणी - 500 क्युसेक्स
कोयना प्रकल्पातून मिळणारी वीज - 2 हजार मेगावॉट

कोयना धरणातील शिल्लक पाण्याचे मे अखेरपर्यंत उपयोग करून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करण्याचे नियोजन आहे. मागील काही महिने आम्ही काटकसरीने पाण्याचा वापर करत होतो. यापुढे मागणीच्या काळात वीज निर्मिती करावी लागणार आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीत पुरेसे पाणी राहील. चिपळूण शहर आणि आजुबाजूच्या परिसराला पाणी मिळेल.

संजय चोपडे, मुख्य अभियंता, महानिर्मिती कंपनी, पोफळी
Exit mobile version