| चिरनेर | प्रतिनिधी |
चिरनेर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘इंडिया आघाडी’चे अधिकृत थेट सरपंच पदाचे उमेदवार भास्कर मसणाजी मोकल यांचे पारडे जड असून, त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारातून बोलले जात आहे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने सरपंचपदांचे उमेदवार व सदस्यपदांचे उमेदवार तसेच कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागले आहेत.
काही ठिकाणी रक्ताचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उभे आहेत. त्यामुळे नक्की कोणाला मतदान करायचे, या संभ्रमात मतदार राजा पडला आहे. चिरनेर परिसरात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. गावागावात, पारावर, सार्वजनिक ठिकाणी निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी आहे, कोण किती मते घेणार, कोणी किती विकासाची कामे केली याचे विश्लेषण सुरू आहे.
यावेळी इंडिया आघाडीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार भास्कर मोकल यांच्याशी संपर्क साधला असता, आमच्या आघाडीने जाहीरनामा किंवा वचननामा प्रसिद्ध केला नाही. परंतु मी एवढेच सांगू इच्छितो की, मी निवडून आल्यावर येथील नागरिकांना ज्या काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत. त्या समस्यांना सर्वात जास्त प्राधान्य देईन. इतर विकास कामे तर होतच राहतात. पण गावाच्या ज्या काही समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. चिरनेरचे मतदार हे जागरूक मतदार आहेत. त्यामुळे येत्या 5 तारखेला चिरनेर ग्रामपंचायतीच्या मतपेटीत आपल्याला निश्चित बदल दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.