चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा दिन साधेपणाने

ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेण्यात आला निर्णय ; विकासकामांकडे दुर्लभामुळे सरकारविरोधात रोष

| उरण | वार्ताहर |

चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत उद्भवणारी पूरपरिस्थिती आणि विकासाच्या कामांकडे शासकीय यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 93 वा हुतात्मा दिन अगदी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. देशातील स्वातंत्र्य संग्रामातील 25 सप्टेंबर 1930 साली ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रह इतिहासातील सुवर्ण पान म्हणून ओळखले जाते.चिरनेर जंगल सत्याग्रहात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यावर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला होता.या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी ( चिरनेर ), रघुनाथ मोरेश्वर न्हावी ( कोप्रोली ), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील ( पाणदिवे ), हसूराम बुधाजी घरत ( खोपटा ), आलू बेमट्या म्हात्रे ( दिघोडे ), नाग्या महादू कातकरी आदी आठ आंदोलकांनी हौतात्म्य पत्करले होते.

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात गौरवशाली इतिहास, हौतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी आणि नव्या पिढीलाही इतिहास ज्ञात व्हावा यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी चिरनेर येथील हुतात्मा स्मारकासमोरच हुतात्म्य दिन साजरा केला जातो.यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते.हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय मानवंदना दिली जाते. ऐतिहासिक चिरनेर गाव विकासांच्या कामांपासून कोसो दूर आहे.आता तर धनदांडग्यांनी रस्ते, नाले आणि गावातील हद्दीत ठिकठिकाणी केलेल्या वाढत्या बेकायदेशीर अतिक्रमणे व बांधकामांमुळे चिरनेर गावात दरवर्षी पुरजन्य परिस्थिती निर्माण होते.मात्र ग्रामस्थांच्या तक्रारींनंतरही याकडे शासकीय यंत्रणेकडून पूर्णपणे दुर्लक्षच केले जात आहे.यामुळे चिरनेर गावात दरवर्षी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी प्रशासक विकास मिंडे , ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, जयेश खारपाटील, समाधान म्हात्रे, समीर डुंगीकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version