| चिरनेर | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती क्षेत्रात अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंगळवारी हजारो भाविकांनी श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. रात्री तीन वाजताच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावेळी प्रथम श्री महागणपतीचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत भक्तीमय वातावरणात श्रींचे दर्शन घेतले. यावेळी हजारो गणेश भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
या निमित्ताने गणेश मंदिरात दिवसभर अनेक भजनी मंडळांकडून भजनांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. श्री महागणपतीचे देवस्थान अत्यंत पुरातन व जागृत असून, येथील श्रींच्या दर्शनासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उरण, पनवेल, पेण तसेच राज्याच्या अनेक भागातून, आलेल्या हजारो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण चिरनेर गाव भाविक भक्तांनी फुलून निघाले होते. भक्तगणांची गैरसोय होऊ नये, सर्वांना सुखकर सोयी सुविधा मिळून, रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी चिरनेर गणपती देवस्थान प्रशासनाकडून आवश्यक सुसज्ज नियोजन करण्यात आले होते. अंगारकी चतुर्थी निमित्ताने श्री महागणपतीच्या दर्शनासाठी आलेल्या गणेश भक्तांच्या अफाट गर्दीमुळे चिरनेरच्या पावन तीर्थात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
चिरनेरचा श्री महागणपती नवसाला पावणारा गणपती आहे. अशी गणेश भक्तांची श्रद्धा आहे. अनेक गणेश भक्तांना अनुभूतीदेखील आलेली आहे. त्यामुळे गणेश भक्त हे न चुकता दर संकष्टीला आणि माघी गणेशोत्सवानिमित्त श्री महागणपती दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दिवसेंदिवस गणेश भक्तांच्या गर्दीचा उच्चांक वाढत चालला आहे.