चिरनेरच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी परंपरा

आ.बाळाराम पाटील यांचे प्रशंसोद्गार
हुतात्म्यांना अभिवादन,पोलिसांची सलामी

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर गाव स्वातंत्र्य लढ्याचे सुवर्णपान आहे या गावाला भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाची परंपरा लाभली, हे या भूमीचे मोठे भाग्य आहे असे गौरव उदगार आ.बाळाराम पाटील यांनी रविवारी ( 25 सप्टेंबर) चिरनेर येथे हुतात्मादिन कार्यक्रमात काढले 25 सप्टेंबर 1930साली ब्रिटिश सरकारच्या जंगल कायद्याच्या विरोधात चिरनेरच्या अक्कादेवी माळरानावर जंगल सत्याग्रह झाला होता या जंगल सत्याग्रहाचा 92 वा हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात आला यावेळी या नियोजित कार्यक्रमात पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

देशभक्तांच्या स्मृती प्रित्यर्थ चिरनेर येथे उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मृतीस्तंभाला माजी खासदार अनंत गीते, आ. बाळाराम पाटील यांनी प्रारंभी पुष्पचक्र अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उद्योगपती पी.पी. खारपाटील, पनवेल मनपा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,राजिपचे माजी सदस्य बाजीराव परदेशी, शिवसेनेचे उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पाटील शिवसेनेचे बबन पाटील, सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सरपंच संतोष चिर्लेकर जेएनपीटीचे विश्‍वस्त भूषण पाटील, माजी सभापती भास्कर मोकल, नाभिक समाजाचे अध्यक्ष अरूण जाधव तसेच अन्य मान्यवरांनीही स्मृति स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करीत आदरांजली वाहिली.

अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य चिरकाल टिकवणे ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आपण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना हुतात्म्यांच्या शिल्प चित्रे उभारण्यात आली. त्यामुळे नव्या पिढीला हा इतिहास समजू शकला. ज्यांच्या बलिदानामुळे भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवली त्या हुतात्म्यांची स्मारके पुढील पिढीला दीपस्तंभासारखीच प्रेरणादायी ठरतील.

– आ. बाळाराम पाटील

जंगल सत्याग्रहातील हुतात्मे हे स्वातंत्र्यलढ्याचे घटक आहेत असे प्रतिपादन माजी खासदार अनंत गीते यांनी केले. गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीचा एक भाग म्हणून चिरनेर या ऐतिहासिक गावात जंगल सत्याग्रह झाला. जंगल सत्याग्रह या नावातूनच सत्याग्रहाचा हेतू स्पष्ट होतो असे ते म्हणाले. येथे पूर्वी शेती फार कमी होती आणि जंगलांचे प्रमाण जास्त होते त्यामुळे येथील दुर्गम भागातील जनतेचे जंगल हे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन होते परंतु ब्रिटिश सरकारने जंगल तोडीला बंदी घातली होती या ब्रिटिश सरकारच्या जंगल कायद्याच्या विरोधात चिरनेर येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला हा सत्याग्रह संपूर्ण भारतात गाजला होता,असेही गीते यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्यामुळे स्वतंत्र भारत स्वतंत्र हिंदुस्तान म्हणून आपण आनंदाने जगत आहोत . हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा गौरव करणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे. चिरनेरच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याची माझी ही दुसरी वेळ आहे.

– अनंत गीते,माजी केंद्रीय मंत्री

पोलिसांच्यावतीने बिगूल वाजवून व बंदुकीच्या तीन फैर्‍या झाडून शासकीय इतमामात स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी हुतात्मा अमर रहे च्या जयघोषाने चिरनेर परिसर दुमदुमून गेला. दरम्यान हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा माजी खासदार अनंत गीते, आ. बाळाराम पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रारंभी सरपंच संतोष चिर्लेकर, उपसरपंच प्रियांका गोंधळी , राजिपचे सदस्य बाजीराव परदेशी, उपसभापती शुभांगी पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक सरपंच संतोष चिरलेकर यांनी केले. यावेळी नटवर्य नाना पाटील या नवीन बांधण्यात आलेल्या रंगमंचाचे उद्घाघाटन गीते यांच्या हस्ते करण्यात आल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार धनेश ठाकूर यांनी व्यक्त केले

Exit mobile version