कर्नाळात पक्ष्यांचा किलबिलाट

| पनवेल | प्रतिनिधी |

धकाधकीच्या आयुष्यातून कंटाळलेल्या आणि रोजच्या रहाटगाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी नोकरदार वर्गाला निवांत होण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कर्नाळा अभयारण्य. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट जंगलात विखुरलेल्या या अभयारण्यातील हिरवीगर्द झाडी.. देशी आणि तितक्याच जुन्या वनस्पती. थंड हवेचा गारवा आणि शांततेत कानावर पडणारा पक्ष्यांचा किलबिलाटामुळे सुखावणाऱ्या या क्षणांची अनुभूतीसाठी पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.

पनवेलपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्य असल्यामुळे पर्यटकांची पसंती मिळते. पावसाळा सरताच ऑक्टोबर महिन्यापासून पनवेलच्या या जगप्रसिद्ध कर्नाळा अभयारण्यात पक्षी पाहण्याच्या पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. सप्टेंबर महिन्यात लाडका तिबोटी खंड्या अर्थात किंगफिशर निघून गेला असला, तरी नैसर्गिक सौंदर्य आणि स्थानिक 150 प्रकारचे पक्षी व माकडे पाहण्यासाठी पुणे-मुंबईतील पर्यटक गर्दी करीत आहेत. अशातच पावसाने उघडीप दिली असल्याने विविध पक्ष्यांबरोबर आणि जंगलातून वाहणाऱ्या झऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी पायवाटांवर पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. या भागात झाडांवर आणि झाडी-झुडुपांमध्ये राहणारे पक्षी पाहण्यासाठी वन विभागाने हट सुद्धा तयार केल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता विविध सुविधांमुळे स्थलंतराच्या हंगामातील विविध पक्षी पाहण्याची संधी मिळत आहे. त्यात ब्लॅकबर्ड, ब्ल्यू हेडेड रॉक थ्रश, रेड ब्रेस्टेड फ्लाईकॅचर, राख मिनीवेट, ब्लॅक हेडेड कोयल-श्राईक आदी काही प्रवासी पक्षी प्रामुख्याने आकर्षण असल्याने सप्टेंबर महिन्यात कर्नाळा अभयारण्याला जवळपास 4 हजार 412 पर्यटकांनी भेट दिली.

कौटुंबिक सहलींसाठी जवळचे ठिकाण
जून ते सप्टेंबरपर्यंत घरटी करून स्थलांतरीत पक्षी राहतात. नंतर हिवाळ्याच्या मोसमात पुन्हा पुढील प्रवासाला मार्गक्रमण करतात. कर्नाळा अभयारण्यात पाहण्यासाठी अनेक विविध पॉईंट आहेत. सकाळी या अभयारण्यात पोहोचल्यानंतर संध्याकाळपर्यंत पक्षी पाहत आणि जंगलात फेरफटका मारत वेळ कसा निघून जातो, हे कळतंच नाही. वन विभागानेही या ठिकाणी काही पक्षी आणि प्राणी आणून पिंजऱ्यात पाहण्यासाठी ठेवल्यामुळे बच्चे कंपनी आणि ज्येष्ठ नागरिकांचे हे आवडते ठिकाण आहे. पावसाळ्यात वृक्ष कोसळणे, धबधबे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या भीतीमुळे लहान मुलांच्या आणि कौटुंबिक सहलींचे प्रमाण कमी असते. परंतु, आता येणाऱ्या हिवाळ्यात पर्यटकांचा राबता आणखी वाढणार आहे.

पुणे-मुंबईजवळचे एकदिवसीय पर्यटन स्थळ म्हणून कर्नाळा अभयारण्याला पसंती मिळते. पावसाळ्यानंतरच्या हंगामात पर्यटकांची संख्या वाढते. त्यामुळे पर्यटकांसाठी विविध सुविधा देण्यावर भर दिला जात आहे.

एन.डी.राठोड, वन अधिकारी, वनविभाग, कर्नाळा
Exit mobile version