चाळीसहून अधिक गावांना शुद्ध पाणी द्या; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उमटे येथील धरणाचे गाळ काढण्यास जिल्हा परिषद उदासीन ठरत आहे. त्यामुळे चाळीसहून अधिक गावांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेत मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांची भेट घेतली. नागरिकांना शुद्ध पाणी द्या, गाळ काढा, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला दुजोरा देत गाळ काढण्याबरोबरच मुबलक व शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बास्टेवाड यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, उपअभियंता निहाल चवरकर, टेंबुलकर, अलिबाग तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, अंजली ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते नितीन पालकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. उमटे धरणातून 60 हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातील गाळ काढण्याचा गाजावाजा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे आमदार दळवी यांनी दोन वर्षांपूर्वी केला होता. मात्र, गाळ काढण्यात ते अपयशी ठरले. सत्ताधार्यांच्या अपयशामुळे उमटे धरणात गाळ अधिक व पाणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तीन-तीन, चार-चार दिवस पाण्याची प्रतीक्षा करुन नशिबी गढूळ पाणी मिळत आहे. या गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजार होण्याची भीती अधिक आहे. ही बाब चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी त्यांनी दूषित पाण्याबरोबरच धरणातील गाळाच्या प्रश्नाला दुजोरा देत सामाजिक बांधिलकीतून गाळ काढण्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल, धरणात पाण्याचा साठा मुबलक राहावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देत पाणीप्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन बास्टेवाड यांनी दिले. जर सरकारी यंत्रणेकडून त्वरित गाळ काढण्याचे काम होत नसेल, तर आम्ही स्वतः जातीने लक्ष देऊन सामाजिक बांधीलकीतून उमटे धरणाचा गाळ काढण्यास पुढाकार घेऊ, त्यासाठी आम्हाला परवानगी द्यावी, अशी चित्रलेखा पाटील यांनी मागणी केली आहे.