| चौल | प्रतिनिधी |
चौलमळा येथील सुवासिनी दत्तात्रेय नाईक यांचे मंगळवारी (दि. 29) वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. निधनसमयी त्या 76 वर्षांच्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या त्या सासूबाई होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी नाईक कुटुंबियांचे बुधवारी (दि. 30) त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले.
सुवासिनी नाईक ह्या 1960 चे महाराष्ट्र श्री स्व. दत्तात्रेय नाईक (भाऊ) यांच्या पत्नी होत्या. दत्तात्रेय नाईक चौलमळा येथे पंचामृत नावाने व्यायामशाळादेखील सुरू केली आहे. परंतु, भाऊंच्या आकस्मिक निधनानंतर त्यांची आठवण म्हणून संपूर्ण व्यायामशाळेची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेत आजतागायत व्यायामशाळा सुरू ठेवली आहे. सुवासिनी नाईक यांच्या पश्चात त्यांच्या पाच कन्या अनिता म्हात्रे, रुपाली म्हात्रे, जागृती म्हात्रे, आरती चव्हाण, शमा पावले, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सुवासिनी नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मंडळींनी उपस्थित राहात त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पार्थिवावर चौलमळा येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत कुटुंबियांचे सांत्वन केले. कै. सुवासिनी नाईक यांचे दिवसकार्य गुरुवार, दि. 7 नोव्हेंबर रोजी, तर उत्तरकार्य (तेरावे) शुक्रवार, दि. 8 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.