मुरूडच्या विकासासाठी कटीबध्द: चित्रलेखा पाटील

| आगरदांडा | प्रतिनिधी |

विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे येथील जनतेने शेतकरी कामगार पक्षाला एक संधी देऊन आमच्या नगराध्यक्षासह 10 नगरसेवक उमेदवारांना सभागृहात पाठवावा मुरूडच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असा विश्वास व्यक्त करीत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंकीता मनिष माळी या वकील आहेत. अन्य उमेदवारदेखील उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे जनतेने यांचा विचार करावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

मूरूडमधील प्रभाग क्रमांक 4 अ मधील नगरसेवकपदाचे उमेदवार अनंत शंकर म्हसळकर यांच्या प्रचारावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी पक्षांचे निवडणूक निरीक्षक मधुकर ढेबे, अलिबाग माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, जगदीश भोसले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंकिता माळी, शैलेश काते, दिपक म्हसळकर, विजय म्हसळकर, सुप्रिया राजपुरकर,प्रतिक्षा म्हसळकर,ज्योती म्हसळकर, श्रध्दा म्हसळकर, धनश्री म्हसळकर, ऋतुजा कोतवाल, शैला काते, लक्ष्मण म्हसळकर, आदींसह शेकाप पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, शहरातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच जनतेच्या सेवेसाठी चौवीस तास उपलब्ध असतात समाजकारणात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभाग असतो. प्रभाग 4 अ मधील शेकाप पक्षांचे उमेदवार अनंत म्हसळकर यांना एकदा संधी द्यावी. त्यांचा या प्रभागात चांगला संपर्क आहे. या भागातील प्रश्नांना थेट उत्तर देण्यासाठी राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

त्यात जगदीश भोसले सारखे जूने जाणते आक्रमक कार्यकर्ते सोबत असल्यावर विजय हा सोपा होणार आहे. मुरूड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. भविष्यात मुरूड शहराचा नियोजनबद्ध विकास करायचा आहे. त्यासाठी येथील मतदारांनी आमच्या शिलेदारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. सभागृहात जाण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

जनतेच्या हितासाठी उभा आहे: अनंत म्हसळकर
प्रभाग क्रमांक 4 अ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अनंत म्हसळकर यांनी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील व शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचे उमेदवारी दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत सांगितले की, चित्रलेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला शहराचा नियोजनबद्ध विकास करायचा आहे. त्यामुळे येथील जनतेने आमच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे. आम्ही राजकारणात पैसा कमविण्यासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी आलो आहोत. जनतेच्या हितासाठी या निवडणूकीत उभा राहिलो आहे, असे मत यावेळी शेकाप पक्षांचे उमेदवार अनंत शंकर म्हसळकर यांनी व्यक्त केले.
Exit mobile version