| अलिबाग | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांचे शुक्रवारी दुपारी काँग्रेसभवनमध्ये आगमन होताच, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणार्या काँग्रेसकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विजयाचा जयघोष करण्यात आला.
पंजाची साथ असेल, तर विजय निश्चित
काँग्रेस हा एक वेगळ्या विचारांचा पक्ष आहे. या पक्षामधील गांधी कुटुंबातील दोन नेत्यांनी दिलेले बलिदान विसरता कामा नये. या निवडणुकीत पंजा पाठीशी असेल, तर विजय हा नक्कीच असेल, असे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, भविष्यात राहुल गांधी पंतप्रधान असतील, गोरगरीबांना न्याय देणारे ते नेते आहेत. आज समाजात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा गैरवापर करीत समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. संगणक, मोबाईल गांधी कुटुंबियांनी देशात आणला, हे विसरता कामा नये. त्यांच्यामुळे देशाची खरी प्रगती झाली आहे, याची जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.
सर्वांचे लाडके पप्पा म्हणजे माजी आ. मधुकर ठाकूर यांनी माणुसकी व सच्चा विचार घेऊन काँग्रेसचे काम केले. तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून गोरगरीबांसाठी त्यांनी काम केले. तालुक्यात जे राजकारण सुरु आहे, ते अतिशय भयावह आहे. जी कीड लागली आहे, ती काढून टाकण्याची वेळ आली आहे. त्यांना चिखलात लोळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले.
चित्रलेखा पाटील यांना आमदार करण्यासाठी सज्ज व्हाः अॅड. प्रवीण ठाकूर
देशासह व राज्यातील नको ती घाण आहे, ती काढण्याची गरज आहे. वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. खर्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो याचा आनंद आहे. अनेकांनी आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, आम्ही निष्ठावंत आहोत, हाताला हात घालून काम करणारे कार्यकर्ते आहोत. महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देऊ. त्या आमदार व्हाव्यात, सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवावेत, ही अपेक्षा आहे, असे काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड. प्रवीण ठाकूर यांनी केले.