बांधबंदिस्तीसाठी आर्थिक मदत जाहिर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील बळीराजावर संकट ओढावले आहे. मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. मराठवाड्यात तर शेतीचा चिखल झाला आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही चांगलाच बसला. मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. अशी परिस्थिती असताना आमदार साहेब आणि त्यांचे बगलबच्चे तुला करण्यात मग्न आहेत. तर शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली. लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेकाप तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी प्रशासनाला दिला. तसेच बांधबंदिस्तीसाठी आर्थिक मदत जाहिर केली.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विशेष करून अलिबाग तालुक्यातील खारेपाट व अन्य भागातील भातपीक पाण्याखाली गेले. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी (दि.1) खारेपाट परिसरातील नुकसान झालेल्या भात पिकांची पाहणी केली. शहापूर, धेरंड येथील शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शेकाप तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही दिली. दरम्यान, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याची सुचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप शेतकरी तालुका सभा अध्यक्ष अनिल पाटील, शेकाप तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, राजन पांचाळ, विक्रांत वार्डे आदी शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष कायमच तळागाळातील घटकाशी बांधिलकी जपणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. शेतकरी, कष्टकरी कामगारांच्या हितासाठी काम करणारा पक्ष म्हणून शेकापची ख्याती आहे. अतिवृष्टीमुळे भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ही बाब शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अलिबाग तालुक्यातील धेरंड, शहापूर येथील शेताच्या बांधावर जाऊन तेथील नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत शेकाप शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.
रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी अलिबाग, रोहा आणि मुरुड सह सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भातपीकांचे तसेच बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे, तयार झालेली पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी पडली आहेत. संपूर्ण शेतीचा भाग जलमय झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, जर बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
चित्रलेखा नृपाल पाटील
शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या
