ज्येष्ठांकडून होतोय विश्वास व्यक्त
| चणेरा | प्रतिनिधी |
अलिबाग, मुरुड, रोहा मतदारसंघात विद्यमान आ. दळवी, अपक्ष दिलीप भोईर आणि महाविकास आघाडीच्या तरुण तडफदार उमेदवार म्हणून चित्रलेखा पाटील यांना संधी देण्यात आली आहे. सध्या प्रचाराचा झंझावात सुरू असून, त्यामध्ये चित्रलेखा पाटील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. चित्रलेखा पाटील यांच्याकडून गावभेटी घेण्यात येत असून, त्यादरम्यान ज्येष्ठांचे आशीर्वादही घेत आहेत. त्यामुळे गावागावातील ज्येष्ठांकडूनही चिऊताईच आमदार होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक दशकांपासून या रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रायगडच्या राजकारणात आपला दबदबा अबाधित ठेवला आहे. आज त्यांच्या पाठोपाठ सामान्य जनतेचा बुलंद आवाज चिऊताईंच्या रूपाने पुन्हा एकदा विधानसभेवर धडाडणार असून, कार्यकर्ते कानाकोपरा पिंजून काढून ताईंच्या विजयासाठी झटत आहेत.
निवडणूक म्हटले की, नेत्यांचा इकडून तिकडे, तिकडून इकडे असा घोडेबाजार संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. परंतु, शेतकरी कामगार पक्ष असा पक्ष आहे की निष्ठेला आणि प्रामाणिकतेला प्रथम प्राधान्य देतो. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कार्यकर्त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. त्यामुळे आजही पक्षात येणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण, त्यांना माहीत आहे की, विकास हवा असेल तर शेकापशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजपा या पक्षातील अनेक नेते व गावाच्या गाव शेतकरी कामगार पक्षात दाखल होताना बघायला मिळत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाला अच्छे दिन आले असून, या निवडणुकीत चिऊताईंच्या रूपाने चमत्कार घडलेला पाहायला मिळेल, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.