चित्रलेखा पाटील यांच्याकडून यशश्रीच्या कुटुंबियांचे सांत्वन

यशश्रीच्या न्याय्य हक्कासाठी शेकाप सदैव पाठीशी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीची क्रूर हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध शेतकरी कामगार पक्षामार्फत करण्यात आला असून, मंगळवारी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी उरण येथे जाऊन यशश्रीच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सांत्वन केले.
उरण येथील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. रायगडकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला. महाराष्ट्रात माहिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, हे वास्तव धक्कादायक आहे. अशा घटनांमधील काही आरोपींना गजाआड केलेय, तर काही अजूनदेखील मोकाट आहेत. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही, माझी लाडकी बहीण सुरक्षित नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, यशश्रीच्या हत्येबाबत शेतकरी कामगार पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये, हीच अपेक्षा आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी उरण येथील यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेतली.

त्यानंतर उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांची भेट घेऊन उरणमध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीत वाढ होत आहे. पोलीस खात्याने आपत्कालीन नंबरची जनजागृती केली पाहिजे. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. यशश्रीच्या न्याय्य हक्कासाठी शेकाप सदैव पाठीशी असेल, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

यावेळी उरण महिला तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या सीमा अनंत घरत, माजी उपसभापती वैशाली पाटील, शहराध्यक्ष नैना पाटील, उपाध्यक्ष रंजना पाटील, ज्येष्ठ शेकाप नेत्या चंपाताई पाटील, रूपाली पाटील उपसरपंच बोकडविरा, शेकाप उरण कार्यालय चिटणीस यशवंत ठाकूर, नागाव ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र म्हात्रे, निलेश पाटील, नारायण पाटील, नामदेव घरत, जासई शशिकांत म्हात्रे, अरुण घरत, प्रिया शहा व इतर सर्व शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version