। अलिबाग । प्रतिनिधी।
गोरगरीबांना केंद्रबिंदू ठेवून काम करायचे आहे. पक्षाची ताकद विरोधकांना समजली पाहिजे या भूमिकेतून काम करून पुन्हा एकदा पक्षाला अधिक चांगली उभारी देण्याचे काम करू या, क्रिकेटसाठी अद्ययावत असे क्रीडांगण, रखडलेले पाण्याचे प्रश्न, वाड्या वस्त्यांमध्ये ‘ताईची सावली’ ही घरकुल योजना राबवून गरीबांना हक्काचे घर देण्याचा प्रयत्न शेकाप करीत आहे. आमदार म्हणून अधिवेशनात प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच क्रीडा, शैक्षणिक अशा अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी सांगितले.
अवेटी रामदासवाडी येथे सुनील म्हात्रे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अलिबाग, मुरूड व रोहा विधानसभा मतदार संघातील शेकापच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई रविवारी (दि.27) बोलत होत्या. शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा कष्टकरी, शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेची आणबाण शान आहे. 75 वर्षांची परंपरा असलेल्या पक्षाने अनेक लढे दिले आहेत. संघर्ष केले आहेत. तसेच त्यागही केला आहे.
शेकापचे नेते जयंत पाटील तरुण, महिलांना पुढे नेण्याचे काम करीत आहेत. त्यांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी पुढाकार घेत आहे. हे वेगवेगळ्या उपक्रमातून दिसून येत आहे. राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात तरुणांना संधी देण्याचे काम ते करीत आहेत. मला उमेदवारी देऊन हे त्यांनी दाखवून दिले आहे.
शेतकरी कामगार पक्षाने सर्व घटकाचा विचार केला आहे. शिक्षण, रोजगाराचे साधन खुले करून तरुणांना एक वेगळी संधी देण्याचे काम केले आहे. नारायण नागू पाटील, स्व. स्व. प्रभाकर पाटील, स्व. अॅड. दत्ता पाटील, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील तसेच आपले सर्वाचे नेते जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील यांनी प्रचंड मेहनत घेऊन पक्षाचा पाया खंबीरपणे असा उभा केला आहे.
अॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, यांनी विधानसभा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. तिच परंपरा जपत शेकापचे नेते जयंत पाटील, पंडित पाटील, अॅड. आस्वाद पाटील यांनीदेखील काम केले आहे. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे आज आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. लढवय्या पक्ष म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. जो पक्ष संघर्षातून उभा केला आहे. त्या पक्षाचा सन्मान राखण्याची जबाबदारी नक्की प्रामाणिकपणे करेन. पक्षाने मोठ्या विश्वासने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे. ती चांगल्या पद्धतीने पार पाडून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन अशी ग्वाही चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी दिली.मागील निवडणुकीत आपण गाफील राहिलो. त्यामुळे आपला पराजय झाला आहे. अनेकजण आमदाराच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या पक्षात प्रवेश करीत आहेत. परंतु, या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता काम करायचे आहे.
भरघोस मतांनी निवडून द्या
अॅड. गौतम पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून स्व. अॅड. दत्ता पाटील, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील, माजी आ. पंडित पाटील यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. जनतेचे प्रश्न त्यांनी सातत्याने अधिवेशनात मांडून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. विधानसभा गाजविल्या आहेत. चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या रुपाने तरुण उमेदवार शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे. चित्रलेखा पाटी या सुशिक्षित व उच्च शिक्षित आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे व अधिवेशनात बोलणारे उमेदवार पक्षाने दिला आहे. चित्रलेखा पाटील या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अॅड. गौतम पाटील यांनी केले.