कर्जतमध्ये चॉकलेटची हत्या; कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील मुदे भागातील शिवम अपार्टमेंट परिसरात एका पाळीव कुत्र्याची हत्याची झाल्याची तक्रार प्राणीमित्र संघटना यांनी कर्जत पोलीस ठाणे येथे केली आहे. चॉकलेट नाव असलेल्या त्या कुत्र्याचा गळा घोटून किंवा विष खायला घालून मारल्याचा आरोप प्राणीमित्र संघटना यांनी केला आहे.

मुदे भागातील शिवम अपार्टमेंटमधील 302 मध्ये राहणारे व्यक्तीचा चॉकलेट नावाचा कुत्रा होता.अनेक वर्षे कुटूंबातील सदस्याप्रमाणे वाढविलेल्या चॉकलेट नावाच्या पाळीव कुत्र्याचा 29 जून रोजी मृत्यू झाला. त्यानंतर कुत्र्याचे मालक यांना हा नैसर्गिक मृत्यू नसून त्याला कोणीतरी गळा दाबून किंवा खाण्यात विष घालून मारले असल्याचा संशय आला. त्यामुळे याबाबत त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कर्जत पोलिसांनी त्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन केले. शव विच्छेदन करणारे कर्जत येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी चॉकलेटला गळा दाबून ठार मारले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. मात्र त्याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतरच हे निश्‍चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या संदर्भात कर्जत पोलीस ठाणे येथे पाल स्वमसेवी संस्थेचे सुधीर कुडाळकर, मनेका गांधी, प्राणीमित्र संघटना तसेच उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशनकडून दखल घेण्यात आली आहे. प्राणीमित्र संघटना यांच्या मागणीनंतर भटक्या आणि पाळीव कुत्र्यांना अशाप्रकारे मारणे हा गुन्हा असून,या संदर्भात कर्जत पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version