मातृछाया कुर्डूस संघ ठरला उपविजेता
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळ गरुडपाडा आयोजित स्व. प्रवीण कदम स्मृतिचषक 2023 निमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. 16 रोजी गरुडपाडा अलिबाग येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत चौंडेश्वरी कडसुरे विरुद्ध मातृछाया कुर्डूस या संघात झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपला बहारदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली. कडसुरे संघाच्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत अंतिम विजयाची मोहर उमटवली.
या स्पर्धेतील अंतिम विजयी संघास रोख रक्कम 61 हजार रुपये व आकर्षक चषक, तर उपविजेता मातृछाया कुर्डूस संघास रोख रक्कम 41 हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात आला. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी मरीदेवी धेरंड, तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी नवतरुण कारावी संघ ठरला. या दोन्ही संघांना प्रत्येकी 31 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू निखिल शिर्के (कडसुरे), उत्कृष्ट चढाई समाधान मोरे (कुर्डूस), तर उत्कृष्ट पक्कड रोशन मोकल (कारावी) या खेळाडूंना पाच हजार रुपये, तर पब्लिक हिरो ऋतिक पाटील (धेरंड) यास दोन हजार रुपये रोख पारितोषिक देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
