। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील चौकीचापाडा जिल्हा परिषद शाळेची अवस्था जीर्ण झाली आहे. सतत स्लॅब कोसळत आहे. ही शाळा दुरुस्त करण्याची मागणी करूनदेखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. गावातील ग्रामस्थ, महिला, माजी विद्यार्थ्यांकडूनदेखील पटसंख्यावाढीसाठी योगदान दिले जाते. चौकीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारतीचे बांधकाम आरसीसीचे आहे. या इमारतीचे छताचे तुकडे पडत आहेत. स्लॅबचे लोखंडी स्टील गंजलेले असून, तेदेखील पडत आहेत. या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या चांगली असतानादेखील या शाळेची अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही. शाळेची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषदेकडून कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला नाही, असा आरोप अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती बाळू पाटील यांनी केला आहे. शनिवारपासून शाळा सुरू होणार आहेत. पावसाळ्यात एखाद्या अनुचित प्रकार घडल्यास त्याला जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
शाळेची पटसंख्या 49 असून, ग्रामीण विभागात विद्यार्थी पटसंख्या एक नंबर आहे. दरवर्षी शाळेमध्ये तालुका स्तरावर आणि विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम शाळा व्यवस्थापन समितीतर्फे राबविले जातात. जर शाळेची अशी दुरवस्था झाली, तर शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होऊन विद्यार्थी पटसंख्या कमी होण्यास प्रशासन जबाबदार राहील, असे सांगण्यात आले आहे. 15 जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप लावून शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक व विद्यार्थी हे शाळेच्या गेटसमोर उपोषणाला बसतील, असे अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती जनार्दन पाटील (बाळूशेट पाटील) व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक काशिनाथ म्हात्रे यांनी सांगितले आहे.
चौकीचा पाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या समस्यांबाबत पाहणी केली जाणार आहे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी,
रायगड जिल्हा परिषद







