। स्टुटगार्ट । वृत्तसंस्था ।
डेन्मार्कचा 32 वर्षीय फुटबॉलपटू ख्रिस्तियन एरिक्सन याची फुटबॉल मैदानावरील जिगरबाज वाटचाल प्रेरक, तेवढीच हृदयस्पर्शी आहे. तीन वर्षांपूर्वी युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत खेळताना भर मैदानात हृदय बंद पडल्यामुळे तो कोसळला होता, आता योग्य उपचारानंतर जबरदस्त पुनरागमन साधताना याच स्पर्धेत गोल करण्याचा पराक्रम त्याने साधला.
कोविड महामारीमुळे 2020 मधील युरो करंडक स्पर्धा 2021 साली झाली. तेव्हा 12 जून 2021 रोजी डेन्मार्क व फिनलंड यांच्यातील सामन्यात पूर्वार्ध संपण्यापूर्वी सारे जग क्षणभर स्तब्ध झाले. मैदानावर खेळत असताना एरिक्सनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो मैदानावर निपचित पडला. डॅनिश संघाच्या कर्णधारावर मैदानावरच तातडीने आवश्यक प्रथमोपचार करण्यात आले आणि लगेच तेथून थेट इस्पितळात हलवावे लागले. आवश्यक उपचार झाले. मरणाच्या दाढेतून तो परत आला. या घटनेनंतर वर्षभरातच या धैर्यवान फुटबॉलपटूने क्लब पातळीवर पुनरागमन केले. कतारमध्ये 2022 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी या जिद्दी खेळाडूची डेन्मार्कच्या संघात निवड झाली आणि आता युरो करंडक स्पर्धेत पुन्हा संघाचा आधारस्तंभ बनला आहे. हृदयक्रिया बंद पडून मैदानावर कोसळलेल्या त्या भयाण दिवसानंतर आता एरिक्सन पूर्ण तंदुरुस्त आहे. बरोबर 1,100 दिवसांनंतर रविवारी रात्री त्याने स्लोव्हेनियाविरुद्ध युरो करंडकाच्या मुख्य फेरीतील क गटात संस्मरणीय गोल नोंदविला. सामन्याचा मानकरीही तोच ठरला. सहकारी जोनास विंड याच्याकडून मिळालेला चेंडू छातीवर नियंत्रित करत ताकदवान फटक्यावर एरिक्सनने प्रतिस्पर्धी गोलरक्षकास चकविले. नंतर 77 व्या मिनिटाला एरिक यान्झा याच्या गोलमुळे स्लोव्हेनियाने बरोबरी साधल्यामुळे डेन्मार्कला विजय हुकला.
युरो स्पर्धेत खेळणे नेहमीच खासस्लोव्हेनियाविरुद्धच्या सामन्यानंतर डेन्मार्कचा हुकमी मध्यरक्षक असलेला एरिक्सन म्हणाला, गतवेळच्या तुलनेत यावेळच्या युरो स्पर्धेत माझी कहाणी खूपच वेगळी आहे. सुदैवाने त्या घटनेनंतर मी खूप सामने खेळलो आहे. सामन्यात उतरताना मला खूप आत्मविश्वास वाटतो आणि खेळताना आनंद लुटत आहे. युरो स्पर्धेत खेळणे नेहमीच खास असते. मी खूप आनंदित आहे. युरो स्पर्धेत मी गोल केलेला नाही हे ध्यानात होते, पण माझ्या मनात फुटबॉलव्यतिरिक्त काहीच नव्हते. माझ्या गोलमुळे संघाला मदत झाल्याबद्दल आनंद वाटतो.