। पर्ल । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून चौथ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकरांपैकी कुणाला प्राधान्य मिळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. उभय संघांत बुधवारी पर्ल येथील बोलंड पार्कवर पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात येईल. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिकेत छाप पाडण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुलच्या साथीने अनुभवी शिखर धवन सलामीला येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला एकदिवसीय पदार्पणाची संधी मिळणार का, हे पाहणेही रंजक ठरेल. विराट कोहली तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करेल. चौथ्या स्थानासाठी सध्या श्रेयसचे पारडे जड मानले जात आहे. श्रेयसला 2018च्या आफ्रिका दौर्याचाही अनुभव आहे.