अपूर्ण गटारे, भिकाऱ्यांची वर्दळ, घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिक त्रस्त
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीतील कर्जत स्थानकाच्या अगदी जवळ असणाऱ्या चर्च रोड परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. अर्धवट गटारे, घाणीचे साम्राज्य, पथदिव्यांची अर्धवट सोय, भिकाऱ्यांची वर्दळ आणि दुचाकी वाहनांची अवैध पार्किंगमुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात या अनेक समस्या उद्भवल्याने आम्ही नक्की नगरपरिषद हद्दीत राहतो की, ग्रामपंचायत हद्दीत राहतो असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध भागात लाखो रुपये खर्च करून विकासकाम सुरू आहेत. परंतु प्रामुख्याने नागरी वस्तीतील काम करण्यात पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पालिका स्थापनेपासून अर्धवट असलेली गटारे आजही त्याच स्थितीत असल्याने उघडी गटारात कचरा पडून दुर्गंधी सुटत असते. स्वच्छतेच्या नावाने येथे कायम घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. नागरिकांनी ओरड केल्यानंतरच कचरा उचलला जातो.असे येथील नागरिक सांगतात. कचरा संकलन करणे आणि शहर स्वच्छ ठेवणे हे संबंधित आरोग्य आणि स्वच्छता विभागाचे काम असताना या सर्वबाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप येथील नागरिक करीत आहेत.
कर्जत स्थानक जवळ असल्याने प्रवासी वर्ग आपली वाहने चर्च रोड परिसरात बिनधक्तपणे पार्क करून जातात. परिणामी या रोडवर एखादे मोठे वाहन आल्यास रस्त्यावर ट्रॅफिक निर्माण होते. दोन मोठी वाहने जातील इतका मोठा रस्ता असताना केवळ बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे एक वाहन जाण्यास सुध्दा अडथळा निर्माण होतो.
तर दुसरीकडे या परिसरातील बंद असलेल्या इमारती खाली भिकाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. भिकाऱ्यांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून मोठ्या प्रमाण दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथून जाताना नागरिकांना नाका तोंडावर हात ठेऊन जावे लागत आहे.रात्रीच्या वेळी ही भिकारी मोठ्या प्रमाण गोळा होऊन याच ठिकाणी बसून दारू प्राशन करून मोठ मोठ्याने बडबड करून शिवीगाळ करीत असतात त्यामुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथील सिमेंट काँक्रिट रोडवर मोठ्या प्रमाणात शेवाळ साचलं आहे. या रस्त्यावर साचलेल्या शेवाळामुळे अनेक महिला,ज्येष्ठ नागरिक ,शालेय विद्यार्थी पाय घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रस्तुत प्रतिनिधी यांनी कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना दिनांक 15 ऑगस्ट रोजी फोन द्वारे याबाबतची तक्रार केली होती परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली नाही. गणपती सण तोंडावर आल्याने ह्या रस्त्यावर साचलेल्या शेवाळामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर पालिकेला जाग येईल असे येथील नागरिकांना वाटते.
स्त्यावरील अर्धवट अवस्थेत असलेले पथदिवे, भिकाऱ्यांचा ठिय्या, उघडी गटारे, अस्तव्यस्त पडलेला कचरा, घाणीचे साम्राज्य, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, बेकायदेशीर पार्क केलेली दुचाकी वाहने अशा एक ना अनेक समस्यांमुळे येथील नागरिक हैराण झाले आहे.
गणपती सण तोंडावर आला आहे. त्यापूर्वी पालिका प्रशासनाने चर्च रोड परिसरात रस्तावर साचलेल्या शेवाळावर ब्लिचिंग किंवा अन्य पावडर टाकून रस्ता शेवाळमुक्त करावा. अन्यथा मी स्वखर्चाने या रस्त्यावर पावडर टाकून कर्जत नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराबाबत निषेध व्यक्त करेन.
– राकेश देशमुख, भिसेगाव – कर्जत
सामाजिक कार्यकर्ते
भिसेगाव चर्च रोड परिसरातील बेकायदेशीर पार्क करणाऱ्या दुचाकी वाहने आणि बंद इमारतीखाली बसलेल्या भिकाऱ्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी.
– ॲड. नवनाथ साळुंखे, भिसेगाव







