| अलिबाग | प्रतिनिधी |
बनावट नोटाप्रकरणातील मयत आरोपी भूषण पतंगे यांच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी सुरु झाली आहे. शुक्रवारी (दि.24) सायंकाळी सीआयडीचे पथक अलिबागमध्ये दाखल झाले. त्यांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी केली.
भूषण पतंगे यांच्या घरात अलिबाग पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात बनावट नोटा आढळून आल्या. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस कोठडीत असताना त्याची प्रकृती खालावल्याने त्याला अलिबागहून जे.जे. रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. भूषणचा मृत्यू निमोनियाने झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. मागील आठवड्यात सीआयडीचे पथक अलिबागमध्ये दाखल झाले होते. जिल्हा कारागृहात जाऊन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. शुक्रवारी पुन्हा पथक अलिबागमध्ये दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी चौकशी केली. त्यामुळे अलिबाग पोलीस सीआयडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याचे चित्र आहे.
अलिबाग पोलीस चौकशीच्या फेऱ्यात
