शेकापच्या दणक्याने सिडको प्रशासन नरमले

आसूडगाव रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे लेखी आश्‍वासन; महादेव वाघमारे आमरण उपोषणाला यश

| पनवेल | वार्ताहर |

आसूडगाव से-04 येथील हनुमान मंदिर ते समाज मंदिर हॉल या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या 15 वर्षांपासून रखडले होते. शेतकरी कामगार पक्षाचे महादेव वाघमारे यांनी रहिवाशांच्या न्याय्य हक्कासाठी 6 सप्टेंबरपासून सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यामुळे सिडको प्रशासनाने याची दखल घेत रखडलेल्या रस्त्याचे स्त्याचे काम करणार आहोत, तसेच पावसाळा झाला की लगेच रस्त्याचे डांबरीकरण करू, असे लेखी आश्‍वासन वाघमारे यांना दिले.

आसूडगावमधील बाकी रस्त्यांचे काम अनेक वेळा करण्यात आले आहे, मात्र याच रस्त्याच्या कामाला 15 वर्षे का लागली, असा प्रश्‍न येथील रहिवाशांना पडला आहे. रहिवाशांनी शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांना पत्राद्वारे प्रशासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे साकडे घातले होते.

वाघमारे यांनी या रहिवाशांच्या मागणीची दखल घेऊन सिडको कार्यालय, नवीन पनवेल येथे 6 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण पुकारले होते. सिडकोने उपोषणाची दखल घेऊन आम्ही या रस्त्याचे काम करणार आहोत, तसेच पावसाळा झाला की लगेच रस्त्याचे डांबरीकरण करू, असे लेखी आश्‍वासन वाघमारे यांना दिले.

सिडकोने लेखी दिलेल्या आश्‍वासनाला वाघमारे यांनी तात्पुरते आमरण उपोषण स्थगित करीत असल्याचे पत्र सिडकोला व खांदेश्‍वर पोलीस ठाण्याला दिले आहे. पण, पावसाळा एक महिन्यात संपत आहे. एक महिन्यात रस्त्याचे काम झाले नाही तर पुन्हा सिडको कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा वाघमारे यांनी पत्राद्वारे दिला आहे.

Exit mobile version