सार्वजनिक अतिक्रमणांना अभय
| उरण | वार्ताहर |
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांनी द्रोणागिरी नोड परिसरातील साडेबारा टक्के योजनेतील अनधिकृत टपर्या व चायनीजच्या दुकानावर गुरूवारी (दि.22) कारवाई करून ती बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. सिडकोचे अतिक्रमण विभागाचे एल. एच. डावरे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि पोलिस यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
उरण जवळील द्रोणागिरी नोड-2परिसरातील सेक्टर 46 मध्ये सिडकोने साडेबारा टक्के योजनेत वाटप केलेल्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. यावेळी एक धाबा आणि 12 टपर्या यावेळी तोडण्यात आल्या. खाजगी जागेत केलेले अतिक्रमण सिडकोने तोडले मात्र बाजूलाच लागून असलेल्या सिडकोच्या जागेवरील अनेक टपर्यांना मात्र हात लावला नाही. सिडकोच्या ज्या फुटपाथवर आणि मोकळ्या जागेवर बांधकामे केली आहेत ती का तोडली नाहीत असा सवाल आत्ता जनतेतून होत आहे.
वास्तविक पहाता पाडलेल्या अतिक्रमणांचा नागरीकांना कोणताही त्रास नव्हती. मात्र ज्या अतिक्रमणांचा नागरीकांना त्रास होतो ती मात्र जैसी थी असल्याने सिडकोच्या दुटप्पी धोरणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सिडकोचे अतिक्रमण विभागाचे एच एल डावरे यांच्याकडे विचारणा केली असता ज्या अतिक्रमणांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या होत्या त्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. लवकरच दुसरी अतिक्रमणे देखिल पाडण्यात येतील.असे सूचित केले.