| चिरनेर | प्रतिनिधी |
पनवेल, उरण, नवी मुंबईतील अनेक गावांना शहरीकरणाचा फटका बसला आहे. पूर्वी येथील भूमिपुत्र आपल्या गावाशेजारी मस्तपैकी माळरानावर, मैदानावर खेळायचे, प्रत्येक गावाला गुरचरण होती. मात्र, सिडकोने गावोगावची मैदाने गिळंकृत केली. त्यामुळे आज गावातील तरुणांना खेळण्यासाठी मैदानेच नाहीत. शहरीकरणाच्या नावाखाली सिडकोने भूमिपुत्रांची प्रचंड फसवणूक केली आहे. सुखासुखी खेळणाऱ्या गावोगावच्या तरुणांना आपल्या हक्काचे मैदान मिळावे, यासाठी लढावे लागत आहे. ही शरमेची बाब आहे. द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने गेली 25 वर्षे युवा महोत्सव भरवित आहे. हे सोपे काम नाही, त्यामुळे संस्थापक अध्यक्ष महादेव घरत यांना मी सॅल्यूट करतो, ते माझे जुने सहकारी आहेत. द्रोणागिरी स्पोर्टस ही भूमिपुत्रांची संस्था क्रीडा पटूंच्या विकासासाठी गेली 25 वर्षे धडपडत आहे; परंतु त्यांना आजही मैदान मिळू शकले नसल्याची खंत घरत यांनी व्यक्त करत, आपल्याला हक्काने मैदाने मिळवावी लागतील. तरच आपला येथे निभाव लागेल असे वक्तव्य केले. बोकडविरा-चारफाटा येथे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशनच्या युवा महोत्सवाचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर यांच्यासह व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक शैक्षणिक शासकीय सांस्कृतिक सांस्कृतिक कला अशा विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाच्या नियोजनात शाळेच्या विद्यार्थ्यांनी संचालन व लेझीम पथकाद्वारे उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.






