सिडकोचा अतिक्रमणावर कारवाईचा धडाका

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सिडकोच्या जागेवर अनधिकृत ताबा मिळवून तेथे विना परवानगी वाहन पार्कींग करणाऱ्यांविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच, सिडकोच्या जागेवर अवैधपणे राडारोड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कठोर कारवाई करण्यात येत असून, या वर्षात आतापर्यंत तब्बल 100 डंपर जप्त करण्यात सिडकोच्या भरारी पथकाला यश मिळाले आहे. सिडकोच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत ही सर्वात मोठी कारवाई असून, नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

कामोठे येथील सेक्टर 4 मधील जुई रेसीडेन्सी इमारतीशेजारी सिडकोच्या अभियंत्यांकडे जागरूक नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर, ना-विकास क्षेत्रावर मातीचा भराव टाकून भूखंड निर्माण करून तो स्वमालकीचा भासविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अठरा दिवसांपूर्वी थेट फौजदारी कारवाई करण्यात आली. याच पद्धतीची आणखी एक घटना तीन दिवसांपूर्वी, म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी, कामोठे सेक्टर 5 मधील गोकुळ कॉर्नर सोसायटीजवळ घडली. सिडकोने ना-विकास क्षेत्र घोषित केलेल्या भूखंडावर दोन डंपर विना परवानगी उभे केल्याने, सिडकोच्या अभियंत्यांनी तत्काळ फौजदारी गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका खरटमल करत आहेत.

सिडको आपल्या स्वमालकीच्या जमिनीचे संरक्षण करण्यावर यावेळी अधिक लक्ष केंद्रीत करत असून, अतिक्रमण होऊ नये म्हणून 24 कोटी रुपयांची तरतूद कुंपण बांधणीसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणमुक्त जागांवर तातडीने पोलिस बंदोबस्तात कुंपण उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्ष अखेर अजून एक महिना शिल्लक असताना, गेल्या 11 महिन्यांत मुंबई आणि नवी मुंबई परिसरात विना परवानगी राडारोडा टाकणाऱ्या चालकांविरुद्ध 100 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दक्षता विभागप्रमुख सुरेश मेंगडे यांच्या कठोर सूचना लक्षात घेऊन सिडकोच्या अभियंत्यांनी कारवाईला वेग दिला आहे. यासाठी रात्रीच्या पाळीतही सिडकोचे भरारी पथक कार्यरत असून त्यांना स्थानिक पोलिसांची प्रभावी साथ मिळत आहे. या सर्व कारवायांमधून सिडको अतिक्रमण कर्त्यांविरुद्ध आक्रमक भूमिकेत असून स्वमालकीच्या जमिनी ताब्यात ठेवण्यासाठी झटत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

उरण पनवेल सीमारेषेवर सध्या तब्बल 68 कंटेनर यार्ड बेकायदेशीररीत्या सुरू असून, त्यापैकी बेलोंडाखार येथील सिडकोच्या जागेवरील एक कंटेनर यार्ड सिडकोने 28 नोव्हेंबर रोजी हटवले. याठिकाणी अंदाजे 6 हजार चौ.मी. क्षेत्रावर विटांचे बांधकाम, सुरक्षा केबिन, प्रवेशद्वार, संरक्षण भिंत इत्यादी अनधिकृत रचना पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आल्या. हे अतिक्रमण सिडकोच्या नियम व धोरणांचे उल्लंघन करून, कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आले होते. या कारवाईनंतर इतर 67 बेकायदेशीर कंटेनर यार्ड चालकांचे धाबे दणाणले असून, वन विभाग यावर कधी कारवाईसाठी पुढे सरसावणार अशी टीका सुरू झाली आहे.

Exit mobile version