सिडकोच्या अधिकार्‍यांची रेल्वे स्थानकाला भेट

प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्यांचा घेतला आढावा
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मुंबईतील नेरूळ आणि कोपरखैरणे स्थानकांना सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्यांचा आढावा घेऊन प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली. याचबरोबर संबंधित अभियंते व कंत्राटदारांना सदर समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश दिले.

सिडकोने रेल्वेच्या सहकार्याने नवी मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेचे जाळे निर्माण केले आहे. प्रवाशांचा प्रवास रेल्वे स्थानकावरून सुखकर व सुरक्षित सुरू व्हावा यासाठी सिडको नेहमीच प्रयत्नशील असते. या आकस्मिक भेटी दरम्यान डॉ. मुखर्जी यांनी संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून प्रवाशांना भेडसावणार्‍या समस्यांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी स्थानके व प्रसानधगृहांमध्ये स्वच्छता राखणे, बंद पडलेले दिवे व पंखे दुरुस्त करणे, आवश्यकतेप्रमाणे उद्वाहन/सरकते जीने बसवणे, प्रवाशांची सुरक्षा निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले. तसेच नागरिकांना सुखकर प्रवासा अनुभव घेता यावा यासाठी दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्यासोबतच सदर कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संघटित आणि कार्यक्षम व्यवस्थापन प्रणाली तयार करण्याच्या सूचना त्यांनी अभियंत्यांना दिल्या.

सिडकोतर्फे यापूर्वीच सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांना सामोरे जावे लागणार्‍या समस्यांचा घेण्यासाठी व या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक यांच्या व्यतिरिक्त सिडकोतील अभियंते व अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका प्रतिनिधी (सदस्य) आणि भारतीय रेल्वेचे प्रतिनिधी (सदस्य) यांचा समावेश आहे. प्रवाशांचा लोकल प्रवास रेल्वे स्थानकावरून सुखकर व सुरक्षित सुरू व्हावा यासाठी सिडको नेहमीच कटीबद्ध असेल त्यानी सांगितले.

Exit mobile version