। नवी मुंबई । वार्ताहर ।
सिडकोतर्फे 2021-24 दरम्यान नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, होर्डिंग्ज, क्रशर, डेब्रिज, माती चोरी इ. विरुद्ध धडक कारवाई करण्यात आली. या कारवायांदरम्यान पाच हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. तसेच अनधिकृतरीत्या डेब्रिज टाकणे, माती चोरी, अवैध वाहतूकप्रकरणी 48 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 124 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली सदर मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नवी मुंबई एक सुनियोजित शहर असून, या शहराची अनिर्बंध वाढ रोखणे हे सिडकोचे प्रमुख कर्तव्य आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सिडकोने नेहमीच कठोर पावले उचलली आहेत. त्याअंतर्गतच सध्या सिडकोतर्फे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
या कारवायांदरम्यान एकूण 258 आरसीसी बांधकामे, 640 वीट बांधकामे, 4,587 तात्पुरत्या स्वरूपाची अतिक्रमणे/झोपड्या, 244 होर्डिंग्ज व 15 क्रशर यांविरुद्ध निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. सिडकोच्या भूखंडांवर अवैधरित्या डेब्रिज टाकण्याप्रकरणी एकूण 45, माती चोरी/अवैध वाहतूकप्रकरणी 3 गुन्हे दाखल करण्यात येऊन एकूण 124 डंपर, ट्रक, पोकलेन, जेसीबी, डोझर ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.