| पनवेल | राजेश डांगळे |
शोले…हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड. 47 वर्षानंतरही या सिनेचा गारुड तसूभऱही कमी झालेले नाही. 15 ऑगस्ट 1975 रोजी हा सिनेमा देशभऱात प्रदर्शित झाला आणि अवघी सिनेसृष्टी बदलून गेली. आता सुद्धा जेव्हा जेव्हा हा सिनेमा कुठल्या तरी चॅनेलवर प्रदर्शित होतो त्यावेळी तमाम चित्रपटशौकिन हा सिनेमा पाहिल्याशिवाय रहात नाहीत. इतका पगडा या सिनेमाचा भारतीय सिनेशौकिनांवर आहे. गब्बर हे हाथ नाही, फासी का फंदा है, ठाकूर ये हात मुझे देे, बसंती मच नाचो ये कुत्ते सामने, चल धन्नो, कितने लोग थे,सरकार दो थे,असे संवाद ज्यावेळी कानावर पडतात त्यावेळी त्या कलावंतांची भूमिका आपोआपच नजरेसमोर येते. रमेश सिप्पी यांनी भव्यदिव्य सिनेमाची निर्मिती करताना त्यातील बरेचसे शुटींग हे पनवेल, उरण परिसरात केले होते. अगदी सुरुवातीचा रेल्वे लुटण्याचा जो सीन आहे त्याचे शुटींग हे पनवेल परिसरातील रेल्वे लाईनवर करण्यात आले आहे. शिवाय ठाकुरांची भूमिका बजावणारे ज्येष्ठ अभिनेते संजीवकुमार यांच्यासाठी जी हवेली उभारण्यात आलेली होती ती सुद्धा कोंबडभुजे येथे उभारण्यात आलेली होती. ती आता दोनच दिवसांपूर्वी सिडकोने जमीनदोस्त करुन टाकली. सध्या पनवेल परिसरात विमानतळ उभाऱणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.त्यासाठी सिडकोने अशी बांधकामे पाडून टाकण्याचे काम सुरु केले आहे. त्यात ही हवेलीही आता जमीनदोस्त झाली आहे.पण ज्या ज्यावेळी शोले चॅनेल्सवरुन प्रदर्शित होत राहिल त्यावेळी कोंबडभुजाच्या या हवेलीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.