| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सिडकोतर्फे मिशन 45 अंतर्गत नवी मुंबईतील खारकोपर येथील सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे (मल्टि-लेव्हल कार पार्किंगचे) बांधकाम विक्रमी 42 दिवसांत पूर्ण करण्यात आले. सिडकोचे हे यश साजरे करण्यासाठी शुक्रवार, दि. 25 एप्रिल रोजी विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, शीला करुणाकरन, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ), सिडको, प्रभाकर फुलारी, अतिरिक्त मुख्य अभियंता, सिडको यांसह सिडकोतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिडकोमध्ये आमची मार्गदर्शक तत्वे तडजोड न करता गुणवत्ता, विलंब न करता गती आणि सर्वांपेक्षा महत्त्वाची सुरक्षा हीच आमच्या पायाभूत सुविधांच्या बांधणीमागील प्रेरणा आहेत. ‘मिशन 45’ अंतर्गत करण्यात आलेले सिडकोच्या गृहप्रकल्पामधील बहुमजली वाहनतळाचे (मल्टि-लेव्हल कार पार्किंगचे) बांधकाम हे विकासातील नवीन मानदंड स्थापित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, जे आपल्या शहरांचे भविष्य अधिक उज्वल घडवण्यासाठी योगदान देते, असे विजय सिंघल यांनी सांगितले. सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 67,000 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये गृहनिर्माण योजनेतील इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू असून, यातील सदनिका टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मिशन-45 अंतर्गत सदर महागृहनिर्माण योजनेच्या पॅकेज-4 अंतर्गत खारकोपर येथील भूखंड क्र. 3 वर बहुमजली वाहनतळ उभारण्यात आले आहे. वाहनतळाचे काम 04 मार्च रोजी सुरू होऊन 17 एप्रिल रोजी पूर्ण झाले. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे व जागेच्या अभावामुळे शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, अशा प्रकारच्या बहुमजली वाहनतळामुळे सिडकोच्या गृहसंकुलांतील रहिवशांना आपल्या वाहनांचे पार्किंग करणे सुलभ होणार आहे. बहुमजली वाहनतळ उभारून गृहसंकुलांना अधिक परिपूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल सिडकोने उचलले आहे.