मेट्रो नियो उभारणीकडे सिडकोचा कल

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

महामुंबई क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सिडकोने स्वखर्चाने रेल्वे जाळे तयार करताना बारा वर्षांपूर्वी चार मेट्रो मार्गाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यानंतरच्या तीन मेट्रो मार्गाचीही सिडकोने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून या मार्गावर नाशिकप्रमाणे स्टॅर्डड गेज मेट्रोच्या जागी मेट्रो निओचा पर्याय निवडला आहे. ट्रॉलीवर आधारीत या मेट्रोचे रुळ हे रबरचे असणार आहेत. अनेक विकसित देशात वाहतुकीचे प्रमुख साधन असलेली ही मेट्रो निओ अधिक आरामदायी व पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था मानली जात आहे.

राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत वेगाने उभे राहात आहे. पुढील वर्षी या विमानतळावरुन पहिले उड्डाण होईल असे अपेक्षित आहे. त्यामुळे या विमानतळाच्या चारही बाजूने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची जबाबदारी सिडकोवर येऊन ठेपली आहे. त्याचा आराखडा तीस वर्षांपूर्वी तयार करण्यात आला असून मुंबईतील मानखुर्द पुढे नवी मुंबईत सर्व उपनगरांना जोडणारी रेल्वे सिडकोच्या आर्थिक साह्यावर धावत आहे. रेल्वे नंतर मेट्रोच्या चार मार्गाची उभारणी करण्याचा निर्णय फेब्रुवारी 2010 मध्ये घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी मे 2011 रोजी बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग शुभारंभाने करण्यात आली आहे. पहिल्या चार वर्षांत धावणारी या मार्गावरील मेट्रो सध्या रखडली आहे पण या मार्गाचे काम आता अंतीम टप्यात आले असून केवळ उदघाटनाच्या प्रतिक्षेत हा मार्ग आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी रखडलेल्या या प्रकल्पाला चालना दिली आहे.

बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गानंतर तळोजा एमआयडीसी ते खांदेश्‍वर रेल्वे स्थानक, पेंधर ते तळोजा एमआयडीसी, आणि खांदेश्‍वर ते नवी मुंंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा एकूण 27 किलोमीटर लांबीच्या चार मेट्रो मार्गाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे मात्र हा मार्ग स्टॅण्र्डड गेज प्रमाणे न उभारता मेट्रोनिओ धर्तीवर उभारला जाणार आहे. देशातील पहिली मेट्रोनिओ प्रकल्प हा नाशिक मध्ये साकारण्यात आला असून ही मेट्रो ओव्हरहेड ट्रॅक्षन पध्दतीवर चालविली जाणार असून यातील बस ह्या रबर टायर वरील आर्टिक्युलेटेड इलेक्ट्रीक ट्रॉलीच्या राहणार आहेत. मेट्रोनिओचे डब्बे हे मेट्रोच्या डब्यांपेक्षा आकाराने लहान व वजनाने हलके असणार आहेत. ही वाहतूक व्यवस्था पर्यावरणपूरक असल्याने सिडकोने यानंतरचे मार्ग या पध्दतीने उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील मेट्रोचे जाळे मानखुर्द पर्यंत येणार आहे. रेल्वे प्रमाणेच त्यापुढे सिडको नवी मुंबईतील मेट्रो उभारणार असून हा मार्ग नवी मुंबई विमानतळाला जोडला जात आहे.

Exit mobile version