सततच्या वीज कपातीने नागरिकांचा संताप

ग्राहकांचा उद्रेक, अधिकार्‍यांना धरले धारेवर
। खोपोली । प्रतिनिधी ।
शिळफाटा उपशहर परिसरात मंगळवार वीज दुरुस्तीसाठी अधिकृत बंद ठेवण्याचा वार असूनही आठवड्याचे सातही दिवस वीज पुरवठा खंडित होतो. तक्रार करण्यासाठी केलेल्या फोनवर प्रतिसाद मिळत नाही. थातुरमातुर कामे केल्यामुळे पुन्हा पुन्हा वीज जाते, औद्योगिक भागात तासन् तास वीज नसते, वीजेचा दाब कमीजास्त असतो अशा समस्योमुळे नागरिक संताप व्यक्त करीत असतानाच महावितरण कंपनीचे अधिकारी कोणतेही उपाययोजना करीत नसल्यामुळे अतिवृष्टीमध्ये नागरिकांना अंधारात रहावे लागत आहे. सतत होणार्‍या वीजपुरवठा खंडतमुळे व्यापार्‍यांचेही मोठे नुकसान होत आहे. वीज ग्राहकांच्या प्रचंड उद्रेकाने शिळफाटा व्यापारी संघटनेने महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत आयोजित केलेली बैठक प्रक्षुब्ध वीज ग्राहकांच्या उत्स्फूर्त गदारोळात पार पडली.

यावेळी महावितरणचे उपविभागीय अभियंता सतीश गढरी, शिळफाटा विभागाचे सहाय्यक अभियंता इर्लेकर यांना राजेश अभाणी, राजेंद्र फक्के, सुनील पाटील, कमाल पाटील, छगन राठोड, प्रसाद वाडकर, अशपाक लोगडे, अनिल खालापूरकर, अझीम कर्जीकर यांच्यासह उपस्थितांनी अक्षरश: धारेवर धरले.मंगळवार हा वीज दुरुस्तीसाठी अधिकृत बंद ठेवण्याचा वार असूनही आठवड्याचे सातही दिवस वीज पुरवठा खंडित होतो. तक्रार करण्यासाठी केलेल्या फोनवर प्रतिसाद मिळत नाही, थातुरमातुर कामे केल्यामुळे पुन्हा पुन्हा वीज जाते, औद्योगिक भागात तासन् तास वीज नसते, वीजेचा दाब कमीजास्त असतो अशा अनेक तक्रारी उपस्थितांनी मांडल्या. वरिष्ट अधिकार्‍यांच्या उपस्थितीत दि.27 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या वेळी लेखी दिलेल्या पत्राप्रमाणे एकही काम झाले नाही असा महत्वाचा मुद्दा अनिल खालापूरकर यांनी उपस्थित केला.आता आमची सहनशीलता संपली असून आमचा अंत पाहू नका असा निर्वाणीचा इशारा राजेंद्र फक्के यांनी देताच उपस्थितांनी समर्थन दिले. उपविभागीय अभियंता सतीश गढरी यांनी तातडीने उपाययोजना करीत असल्याचे सांगून ऑगस्ट अखेरपर्यंत सर्व प्रश्‍न सोडवण्याचे मान्य केले.व्यापारी संघटनेच्या वतीने वीज पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास होणार्‍या परिणामांना महावितरण जबाबदार राहील असे स्पष्ट करणारे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राजेश अभाणी यांच्यासह उपस्थितांनी उपविभागीय अभियंता सतीश गढरी यांना सादर करून कार्यवाहीची उपाययोजना करण्याची लेखी हमी देण्याची मागणी केली.

Exit mobile version