माठातील पाणी केमिकल मुक्त
| माणगाव | प्रतिनिधी |
उन्हाळ्याच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना थंड आणि नैसर्गिक पाणी मिळवण्यासाठी नागरिकांचा कल पुन्हा पारंपरिक मातीच्या माठ व रांजणांकडे वळतांना दिसत आहे. आला उन्हाळा तब्बेत सांभाळा अशी स्थिती झाली आहे. फ्रिज मधील अतिथंड पाण्यामुळे घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ऍलर्जी यांसारख्या घशाच्या व शरीराच्या तक्रारी वाढत असल्याने अनेक नागरिक आता माठातील नैसर्गिकरीत्या थंड झालेले पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे माणगाव परिसरात मातीच्या माठ व रांजणांना मोठी मागणी निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून स्थानिक माती भांडी करणाऱ्या व्यावसायिक कारागिरांना पुरेशे भांडवल उपलब्ध होत नसल्याने तसेच परराज्यातील या माती भांड्याच्या तुलनेत विकणे परवडत नसल्याने स्थानिक या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात परप्रांतातून येणाऱ्या माती पासून बनवलेली माठ, रांजण, चूल यासह विविध प्रकारची रंगीबेरंगी व विविध डिझाईनची भांड्याचे आकर्षण वाढले असून, या भांड्याच्या खरेदीसाठी नागरिकांना भुरळ पडत आहे.
स्थानिक बाजार पेठेपेक्षा बाहेरील बाजारपेठेवर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांच्या आवडी निवडीनुसार विविध भांडी बनवणे अवघड बनले आहे. मागणी जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती झाली आहे. मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते, तसेच त्याची चवही वेगळी असल्याने उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी माठातील पाणी अधिक लाभदायी ठरते. दही, ताक ठेवण्यासाठी लहान मडकी आणि भांडीही मोठ्या प्रमाणात वापरली जातात. तर बस स्थानक गावातील वेशीवर किंवा गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर माठ, रांजण ठेवून पाणपोई केली जाते. त्यामुळे अनेक व्याकुळ व तहानलेल्या जीवाची तहान भागते.
कोकणात सध्या सुरू असलेल्या वाल पोपटीच्या हंगामा मुळे पोपटी पार्टीसाठीही माठांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याने या वस्तूंची मागणी आणखी वाढली आहे. माणगाव येथील महामार्गालगत रियांश नर्सरी येथे गेल्या पाच वर्षांपासून हिरालाल यादव विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू आणि नर्सरी व्यवसाय करत आहेत. त्यांच्या नर्सरीमध्ये इंडोर – आउटडोअर प्लांट्स, फुलझाडे, फळझाडे, भाजीपाला रोपे, लॉन ग्रास, तसेच शेकडो प्रकारच्या रोपांची उपलब्धता आहे. यासोबतच मातीच्या कुंड्या, प्लास्टिक कुंड्या, सिमेंट कुंड्या, सिरॅमिक व चिनी मातीच्या कुंड्या, तुळशी वृंदावन कुंडी, फायबर कुंडी, कुंडी प्लेट, शोभेच्या वस्तू, आकाश कंदील, पणत्या, दिवाळी दिवे आणि रंगीत नक्षीकाम केलेले माठ व रांजण यांचीही विक्री केली जाते. रंगीबेरंगी फुलझाडे आणि आकर्षक डिझाइनच्या कुंड्या मुळे ग्राहक या नर्सरी कडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. मात्र, वाढत्या मागणीच्या तुलनेत स्थानिक कुंभार कारागिरांकडे माठ, रांजण, चूल आणि इतर मातीची भांडी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. स्थानिक उत्पादन कमी असल्याने बाजारात परराज्यातून येणाऱ्या मातीच्या भांड्यांची विक्री वाढली आहे. परराज्यातील वस्तूंचे दर तुलनेने कमी असल्याने स्थानिक कारागिरांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. परिणामी पारंपरिक कुंभार व्यवसाय हळूहळू स्थानिकांच्या हातून निसटत चालल्याची खंतही व्यक्त होत आहे.
स्थानिक उत्पादनात घट
एकीकडे नागरिकांकडून मातीच्या भांड्यांना मोठी मागणी असताना दुसरीकडे स्थानिक उत्पादन घटत असल्यामुळे परराज्यातून येणाऱ्या माठ, रांजणांचा बाजार वाढताना दिसत आहे. पारंपरिक कुंभार उद्योग टिकवण्यासाठी स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन व आर्थिक मदत मिळणे गरजेचे असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.







