दिघोडे नाका ते चिर्ले रस्त्यावरील कोंडी फुटणार कधी?
| उरण | वार्ताहर |
दिघोडे नाका ते चिर्ले या रस्त्यावर सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीच्या समस्यांमुळे लोक वैतागले आहेत. त्यातच दरदिवशी सकाळ, संध्याकाळी यांचा त्रास हा नोकरदार, विद्यार्थी, रुग्णांना सहन करावा लागत असून, रस्त्यावरुन मार्गक्रमण करणारे नागरिक आणि वाहनचालक हे हैराण झाले आहेत. तरी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी या मार्गावरुन प्रवास करुन ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनीधी ठाकूर यांनी केली आहे.
उरणच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी उरण तहसील, उरण पंचायत समिती या कार्यालयांच्या अधिकारी वर्गाने शासनस्तरावर प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी अटक सेतू या महत्त्वाच्या मार्गाला जोडणार्या दिघोडे नाका ते चिर्ले आणि विंधणे ते गव्हाण फाटा या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असून, ही वाहतूक कोंडी लोकांसाठी डोकेदुखी बनली आहे. जड वाहनांसह येथे चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. वेडीवाकडी वाहन चालविणारे दुचाकीस्वार, एकेरी मार्गातून उलट दिशेने येणारे चालक यामुळेही येथे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्या कोंडीचा सामना हा मुंबई, कोकणातून येणार्या पर्यटकांना, नागरिकांना सहन करावा लागत आहे.
याविषयी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनीधी ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की, अटल सेतूमुळे दिघोडे ते चिर्ले या ग्रामपंचायत हद्दीतून जाणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक नोकरदार वर्ग, विद्यार्थी, पर्यटक चाकरमानी हे दरदिवशी सकाळ-संध्याकाळी येथून ये-जा करत आहेत. मात्र, येथे वाहतूक कोंडी असल्याने वेळ वाया जातो तसेच शहराच्या ठिकाणी जाणार्या रुग्णांचे हाल होत आहेत. ही परिस्थिती रोजचीच आहे. त्यावर उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम, गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी सततच्या वाहतूक कोंडीची समस्या जाणून घेत लवकरच लवकर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती प्रवासी नागरिकांच्यावतीने करत आहे.