| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरासह खांदेश्वर वसाहत व खारघर उपनगर येथे झालेल्या तीन वेगवेगळ्या घडफोडीच्या घटनांनी येथील नागरिक धास्तावले आहेत. पनवेल शहरातील टिळक रस्त्यावरील मॅस्ट्रो वास्तू दुकानातून दुकानदाराने दुकान बंद केल्यावर रात्रीच्या वेळी दुकानाच्या छताचे पत्रे तोडून दुकानातील नवरत्न स्टोन आणि रोख रक्कम असा 1 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. अशीच स्थिती खांदेश्वर वसाहतीची आहे. मध्यरात्री सेक्टर 15 येथील प्रजापती आर्केड या इमारतीमधील गाळा क्रमांक 10 मधील हॉटेलचे शटर तोडून 70 हजार रुपयांची चोरी केली. तर, खारघर उपनगरात मध्यरात्री सेक्टर 35 या रेझा ग्रॅन्ड ओव्हर या इमारतीची सुरक्षा यंत्रणा चांगली आहे. मात्र, या इमारतीच्या मागील मोकळ्या जागेवरून प्रवेश करत, चार चोरटे इमारतीमधील वाहनतळात शिरले. पहाटे चार वाजता सुरक्षारक्षक झोपले असताना, चोरांनी सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेत प्रवेश केला. या घरातील गृहिणी आणि त्यांच्या दोन मुली झोपल्या असताना घरात काहीतरी हालचाल झाल्याचे या महिलेच्या ध्यानात आले. चोरटे त्यांच्या घरात खिडकीवाटे शिरल्याचे बाहेर पडताना पाहिले. यानंतर सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यावर चोरट्यांनी वाहनतळात शिरल्यानंतर शिडीवाटे तिसऱ्या मजल्यावरील घरात प्रवेश करून मोबाइल व पन्नास हजार चोरले. याबाबतच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात आल्या आहेत.







