। उरण । वार्ताहर ।
एप्रिलमध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेने उरणकरांचा जीव मेटाकुटीला आला आहे. बदलते हवामान आणि आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उरण सर्वाधिक तापमानाचे ठिकाण ठरत आहे. मागील दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण आहेत. त्याच शहरात विजेचा लपंडावही सुरू आहे. विजेचा लोड वाढल्याने रात्रीच्या वेळेत सतत वीजपुरवठा खंडित होत होता. तर, दुसरीकडे हवामान बदलामुळे रुग्णांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे उरणचे तापमान जवळपास 43 अंश सेल्सिअसवर जात आहे; मात्र, अचानक आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा उरणकरांना चांगलाच त्रास सोसावा लागत आहे. मंगळवारी सर्वाधिक तापमान वाढल्याने घरातील पंखे, एसी, कुलर मोठ्या प्रमाणात वापरात आले. त्यामुळे विजेवर ताण पडल्याने रात्रीच्या वेळेत दर तासाला विजेचा खेळखंडोबा सुरू होता. त्यामुळे उरणकरांना रात्र जागून काढावी लागली.
दुसरीकडे वाढलेल्या तापमानाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. उष्णतेमुळे गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यात उलट्या, जुलाब, डोकेदुखी, ताप, रक्तदाब कमी होणे यांसारखे त्रास जाणवणारे रुग्ण गेल्या दोन दिवसांत वाढताना दिसत आहेत. त्यात आता अजून दोन ते तीन दिवस उष्णतेच्या झळा बसणार आहे. तसेच, मान्सून सुरू होईपर्यंत साधारण तापमान हे 37 ते 38 अंश सेल्सिअसवरच कायम राहणार आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास टाळायचा असेल; तर साधारण दुपारच्या 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, सतत पाणी प्यावे, उष्ण व तळलेले पदार्थ खाणे टाळावे असे उरण डॉक्टर वेल्फेअर असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे यांनी सांगितले.
अचानक तापमानाच्या वाढीचा फटका हा नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. शहरातील तापमान 43 अंश सेल्सिअसवर गेल्याने अनेकांना उष्माघातासारखा त्रास जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासूनच शहरात ताप, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, पोटदुखी यांसारखे त्रास होणारे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी पाणी प्यावे. पाणीयुक्त फळे, ताक, लस्सी, बर्फ न टाकता साधा उसाचा रस, नारळपाणी यांसारखे पेय पीत राहण्याची गरज आहे.
डॉ. सत्या ठाकरे,
सेक्रेटरी,
उरण डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन