स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारा ठेका रद्द

अलिबाग नगरपरिषद प्रशासनाची कारवाई

| अलिबाग | प्रतिनिधी |

शहरातील वेगवेगळ्या भागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. वारंवार तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या. मात्र, व्हीडीके ठेकेदाराकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांचा ठेका रद्द करण्यात आला. अलिबागच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी ही कारवाई केली असून, आता दुसऱ्या कंपनीला ठेका दिला आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुटणार, असा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.

अलिबाग शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करीत व्हीडीके कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यात आला होता. सुरुवातीला या कंपनीकडून चांगले काम करण्यात आले. मात्र, शहरातील अनेक भागात कचऱ्याचा ढिगारा वाढू लागला. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. कंपनीच्या ठेकेदाराला वारंवार सांगूनही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास ठेकेदार दुर्लक्ष करीत होते. अनेक वेळा दंडात्मक कारवाईदेखील नगरपरिषद प्रशासनाने केली. तरी देखील तीच परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अलिबाग मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी व्हीडीके कंपनीचा ठेका रद्द करून दुसऱ्या कंपनीला दिला आहे. शहर स्वच्छ व सुंदर दिसले पाहिजे यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एक ऑगस्टपासून शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दुसऱ्या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

व्हीडीके कंपनीकडे स्वच्छतेची जबाबदारी दिली होती. परंतु, कंपनीच्या ठेकेदारांकडून योग्य कार्यवाही केली नाही. वारंवार सूचना देऊनही त्यांच्याकडून अंमलबजावणी झाली नाही. अखेर व्हीडीके कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला आहे. दुसऱ्या कंपनीला ठेका दिला आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न या कंपनीकडून निश्चितपणे सुटले, अशी खात्री आहे.

अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग
Exit mobile version