। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात विविध भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे. रायगडसह रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नका, नागरिकांनी सावधान सतर्क रहा, अशा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येसुध्दा ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. दोन जुलैपर्यंत हा अलर्ट असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, पुणे आणि सातारा जिल्ह्यातदेखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊस जोरदार पडत आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, पुढील काही तास रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. दरडग्रस्त व पुरग्रस्त भागातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहवे, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.