। मुंबई । प्रतिनिधी ।
रस्त्याने पायी चालणारऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांना रंगेहाथ पकडले. त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. विक्रोळी येथे शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.
फिर्यादी ऐश्वर्या राजू (३६) ही महिला विक्रोळीत राहते. शनिवारी संध्याकाळी ती विक्रोळी येथील नारायण बोध पूलाच्या दिशेने चालत दूध आणण्यासाठी निघाली होती. त्यावेळी दोन इसम दुचाकीवरून तिच्याजवळ आले. दुचाकीच्या मागे बसलेल्या एकाने अचानक समोर येऊन ऐश्वर्याच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र ऐश्वर्या यांनी त्याला प्रतिकार करत आरडाओरड केला असता परिसरातील लोकं तिथे जमा झाले. मंगळसूत्र खेचून पळणाऱ्या इसमाला लोकांनी पकडून बेदम चोप दिला. ते पाहून त्याचा दुसरा साथीदार दुचाकीवरून पळून गेला. डेन्झील फर्नांडीस (३८) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने फिर्यादी ऐश्वर्या यांच्या गळ्यातील चोरलेले ४२ ग्रॅम वजनाचे ३ लाख ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे.







