विद्यार्थ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील झुंझार मैदानाजवळील नवेनगर फाट्याच्या मार्गावर असह्य घाणीमुळे स्थानिक नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात उभारण्यात आलेले डंपिंग ग्राऊंड हे रा.जि.प. शाळेच्या अगदी शेजारी असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सातत्याने बिघडत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांनी याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. चायनीज दुकानातील उरलेले पदार्थ, कोंबड्यांची पिसं, बाजारातील सडलेला भाजीपाला व घाण सगळं बेधडकपणे रस्त्यावर टाकलं जातं. यामुळे अर्धा रस्ता कचऱ्याने व्यापला असून, वाहतूक खोळंबते, अपघातही वाढले आहेत.
या दुर्गंधीयुक्त कचऱ्यावर भटके कुत्रे मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले असून, प्रवास करताना वाहनांच्या समोर कुत्रे धावत असल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. पावसात खड्डे पाण्याने भरून जात असल्याने ते नजरेसही न पडता वाहनचालक सरळ त्या खड्ड्यांत पडतात.