नियोजनशून्य कामांचा नागरिकांना फटका

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

मुसळधार पाऊस, समुद्रातील भरती आणि स्थानिक पातळीवरील नियोजनाच्या अभावाचा तिहेरी फटका रेवदंडा परिसरातील नागरिकांना बसला आहे. येथील आंग्रेनगरसह अनेक भाग जलमय झाले आहेत. तसेच, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाच्या संथ आणि निष्क्रिय भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रेवदंडा बहिरी गल्ली ते चौलकडे जाणाऱ्या मोरीचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या पावसाचा आणि पाण्याच्या निचऱ्याचा पुरेसा विचार न करता हे काम करण्यात आल्याने बांधावरून रेवदंड्याकडे जाणारा मार्ग तात्पुरता बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असून, दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. संबंधित कंपनीच्या निष्काळजी आणि नियोजनशून्य कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते सुदेश माळी यांनी केला आहे.

Exit mobile version