| चिपळूण । वार्ताहर ।
कोरोना संसर्गाच्या नवीन व्हेरिअंटने दस्तक दिल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोना वेशीवर आला असतानाही तालुक्यातील नागरिकांनी बुस्टर (प्रिकॉशन) डोसकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तालुक्यातील केवळ 20 हजार 181 लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. पहिला डोस घेतलेल्यांपैकी 33 हजार 462 नागरिकांना दुसरा डोस घेतलेला नाही. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी महत्वपू्र्ण असलेल्या लसीकरणाकडे शहरातील नागरिकांनी पाठ फिरवली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्यामुळे शासकीय व प्रशासकीय यंत्रणांनी लसीकरणावर जोर दिला होता. कोरोना संसर्गाचा धोका होता तोपर्यंत नागरिकांकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता. रामपूर, कापरे, खरवते, दादर, शिरगाव, अडरे, सावर्डे, फुरूस, वहाळ आणि चिपळूण शहर येथे लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगा लागत होत्या. परंतु काही महिन्यांपासून कोरोनाचा धोका कमी झाला. शासनाने देखील सर्व निर्बंध उठवले, त्यामुळे नागरिकांना मोकळीक मिळाली आणि लसीकरणाचा विषय मागे पाडला.
गेल्या काही दिवसापासून चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. लसीकरणासह त्रिसुत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून लसीकरणाबाबत माहिती घेतली असता बुस्टर डोसकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. कोरोनाच्या बदलणार्या रुपाचा सामना करण्यासाठी बुस्टर डोस प्रभावी ठरेल असे मानले जात आहे. ज्या नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे त्या नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. पण दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांपैकी 1 लाख 54 हजार 985 लोकांनी अद्याप बुस्टर डोस घेतलेला नाही. तर पहिला डोस घेतलेल्यांपैकी 1 लाख 88 हजार 447 लोकांनी बुस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे.