| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली पोस्ट कार्यालयात नागरिकांना पोस्ट कार्यालयाची कार्य प्रणाली डोकेदुखी ठरू लागली आहे. अनेकदा येथील सर्व्हर डाऊन होत असल्याने व येथील कर्मचार्यांकडून ग्राहकांना मिळत असलेल्या वागणुकीमुळे या पोस्ट कार्यालयात दररोज नागरिक व कर्मचार्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे.
कळंबोलीतील पोस्ट कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून येथील नागरिकांना आरडी एफडी अशा विविध योजनांचे पैसे भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. या सर्वांवर कळंबोली पोस्ट कार्यालयातील अधिकारी यांनी सरोवर डाऊन असल्याचे कारण सांगून नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहण्यास सांगतात. नंतर वेळ संपल्याचे कारण सांगत त्यांना परत पाठवत आहेत. दरम्यान, एखाद्या जागरूक नागरिकाने आवाज उठवल्यानंतर आमच्या कार्यालयाची तुम्ही तक्रार करा, असे ते सांगतात. त्यातून त्यांच्यात नियमित वाद होत आहेत.
शनिवार, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत पोस्ट कार्यालय सुरू आहे, असे सांगत कॅश काऊंटरवर कॅश घेण्यास सुरुवात झाली. मात्र, एका ग्राहकासाठी साधारण 15 ते 20 मिनिटे वेळ लागत असल्याने मोजक्याच लोकांचे नंबर लागले. मात्र, 12 वाजल्यानंतर येथील शटर डाऊन करण्यात आले. दरम्यान, काही नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता येथील काही अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांना उद्धट उत्तरे देत तुम्ही आमची तक्रार करा, असे स्पष्ट शब्दात त्यांना सुनावले. त्यामुळे येथील कर्मचारी नागरिकांना अयोग्य वागणूक देत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
कळंबोली पोस्ट कार्यालयात नागरिकांची गैरसोय

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606