‘या’ गावांतील नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी

बाहेर जायचंय तर नक्की वाचा… नाहीतर पडतील फटके
अलिबागमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन; रेवदंडा, चौल, नागाव, नवगाव, कुरुळ, सासवण्याचा समावेश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत, सासवणे, नागांव, कुरुळ, नवेदर नवगांव, चौल व रेवदंडा या गावांमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित केलेले आहेत. कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी उक्त क्षेत्रामध्ये ग्रामस्तरीय समितीने नियमांची कठारेपणे अमंलबजावणी करण्याचे आदेश अलिबागचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार वैद्यकिय व अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तींना घराबाहेर पडण्यास पुर्णत: मनाई राहील. वैद्यकिय व अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदार व त्यांचे मदतनीस यांची तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मदतीने अँटीजन तपासणी करणे आवश्यक राहील. त्याशिवाय या सेवेतील विक्रेत्यांना दुकान उघडता येणार नाही.

अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांकडून मास्क वापरणे व सोशल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक राहील. खाजगी वैद्यकिय व्यावसायीकांनी स्वॅब टेस्ट न करता कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोना लक्षणावर आधारित ट्रीटमेंट करु नये. त्यांना तात्काळ नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्वॅब टेस्ट करीता पाठविण्यात यावे. मेडीकल स्टोअर्समधून डॉक्टरांच्या चिट्टीशिवाय औषध, गोळया देण्यात येऊ नयेत. कोरोना बाधीत रुग्णांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये गृहविलगीकरणाचा पर्याय उपलब्ध राहील.

ग्रामपंचायत स्तरावर कोव्हीड केअर सेंटर तयार करुन, यापुढे सर्व करोना बाधीत रुग्णांना सदर कोव्हीड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात यावे. तसेच ग्राम स्तरीय कोव्हीड केअर सेंटर मध्ये जागा उपलब्ध नसल्यास रुग्णांना तालुकास्तरीय कोव्हीड केअर सेंटर मध्ये पाठविण्यात यावे, यापुढील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना गृहविलगीकरण आवश्यक असल्यास विहित नमुन्यामध्ये हमीपत्र व घरामध्ये स्वतंत्र बेडरुम व स्वच्छतागृह असल्याबाबत ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर गृहविलगीकरण करता येईल. गृहविलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींनी पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर 15 दिवसाच्या आत घराबाहेर पडू नये. असे रुग्ण विलिगीकरण कालावधीमध्ये घराबाहेर पडत असल्यास ग्रामपंचायतीने सदर व्यक्तीविरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये विवाह इत्यादी कोणत्याही समारंभास परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी विवाह समारंभास परवानगी दिली असल्यास सदरची परवानगी रद्द समजण्यात यावी असेही आदेशात म्हटले आहे.

गावातील मुख्य व अंतर्गत रस्ते हे पुढील आदेश होईपर्यंत बंद राहतील, तरी शासकीय कर्मचारी व्यतिरीक्त कोणालाही गावा बाहेर जाता व येता येणार नाही. तसेच सर्व दुकाने, बाजार, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. घरातील व्यक्तीने नातेवाईक यांना भेटण्यास जाऊ नये असेही बजावण्यात आले आहे.

Exit mobile version